भरमसाठ वीजबिलामुळे बसला धक्का; संतप्त झालेल्या ग्राहकाने मीटर रीडरचाच केला खून

छोट्या-छोट्या कारणांवरून हाणामारी, खून झाल्याच्या घटना (Crime News) आपण ऐकत असतो. ओडिशातील गंजम जिल्ह्यातील तारासिंग पोलिस स्टेशन अंतर्गत कुपाटी गावात अशीच एक घटना घडली आहे. भरमसाठ वीजबिल आल्यामुळे (Electricity Bill) एका ग्राहकाने मीटर रीडरची (Murder of Meter Reader) हत्या केली आहे.

  बेरहामपूर : छोट्या-छोट्या कारणांवरून हाणामारी, खून झाल्याच्या घटना (Crime News) आपण ऐकत असतो. ओडिशातील गंजम जिल्ह्यातील तारासिंग पोलिस स्टेशन अंतर्गत कुपाटी गावात अशीच एक घटना घडली आहे. भरमसाठ वीजबिल आल्यामुळे (Electricity Bill) एका ग्राहकाने मीटर रीडरची (Murder of Meter Reader) हत्या केली आहे.

  लक्ष्मी नारायण त्रिपाठी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. माहितीनुसार, लक्ष्मी नारायण त्रिपाठी हे सकाळी कुपटी गावात मीटर रिडिंग घेण्यासाठी गेले होते. मात्र, वीज बिल जास्त असल्याने आरोपी चिंतेत होता. ग्राहकाने लक्ष्मी नारायण यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पळून गेला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

  धारदार शस्त्राने वार

  विशेष म्हणजे लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि आरोपीमध्ये यापूर्वीही वीजबिलावरून वाद झाला होता. लक्ष्मीनारायण ग्राहकाच्या घरी पोहोचले असता जोरदार वादावादी झाली. ग्राहकाने दावा केला की, बिलात दाखवलेली रक्कम वाढवली आहे. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. रागाच्या भरात आरोपीने मीटर रीडरवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

  घटनास्थळी तणावाचे वातावरण

  मीटर रीडर कर्मचाऱ्याचा मृतदेह त्या ग्राहकाच्या घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. माहिती मिळताच तारासिंग पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. दुसरीकडे हत्येमुळे त्या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. हत्येच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मीटर रीडर एम्प्लॉईज युनियनचे कार्यकर्ते व मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी मारेकऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.