शांतता-सुव्यवस्था नसताना राज्यात विकास कसा शक्य?- मायावती

    राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या यूपी दौऱ्यादरम्यान कानपूरमध्ये उसळलेला हिंसाचार (Kanpur Violence) अत्यंत दुःखद, दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयशही समोर आले आहे. शांतता- सुव्यवस्था नसताना राज्यात गुंतवणूक आणि विकास कसा शक्य होईल, हे सरकारने समजून घ्यायला हवे, असे मायावती (Mayawati) यांनी ट्विट केले आहे.

    कानपूरच्या बीकनगंजमध्ये नमाजानंतर झालेल्या दंगलीबाबत आता राजकारण सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या अटकेची मागणी केली असून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही या दंगलीबाबत ट्विट करून सरकारला प्रश्न केले आहेत.

    सरकारने धर्म, जात, पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन या घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जेणेकरून राज्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेला प्रक्षोभक भाषणे टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. कानपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या दंगलीत १३ पोलीस जखमी झाले. तर, दंगलखोरांनी मालमत्तेचेही मोठ नुकसान केले आहे.

    नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे कानपूरमध्ये अशांतता

    कानपूर हिंसाचाराच्या संदर्भात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजप नेत्याच्या अटकेची मागणी केली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री शहरात असूनही पोलीस-गुप्तचर विभाग अपयशी ठरल्याचे अखिलेश यादव यांनी ट्विट केल आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे कानपूरमध्ये अशांतता पसरली असून, त्यांना अटक व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केले आहे.