
संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या हस्ते रविवारी नवीन संसद भवनाच्या 'गज द्वार' येथे ध्वजारोहण करण्यात आले. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी हा विशेष कार्यक्रम झाला. या अधिवेशनात संसदेचे कामकाज जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात हलवले जाणार आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या हस्ते रविवारी नवीन संसद भवनाच्या ‘गज द्वार’ येथे ध्वजारोहण करण्यात आले. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी हा विशेष कार्यक्रम झाला. या अधिवेशनात संसदेचे कामकाज जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात हलवले जाणार आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांसह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी नाराजी व्यक्त करत ‘माझी गरज नसेल, तर निघून जातो’, असे सुनावले.
ध्वजारोहणाप्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह विविध पक्षांचे राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार, विविध पक्षांचे नेतेही उपस्थित होते. अधीर रंजन चौधरी यांच्यासह फारूख अब्दुल्ला हेही उपस्थित होते. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी अनुपस्थित होते.
हैदराबादमध्ये काँग्रेसची पूर्वनियोजित बैठक
अधीर रंजन यांना मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘माझी इथे गरज नसेल तर मला कळवा, मी निघून जाईन. जे इथे आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. मी इथे आहे. ते पुरेसे नाही का?’ असा उलट प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमांना केला. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.