जुन्या संसद भवनाला निरोप देताना PM मोदींनी अनेक ऐतिहासिक घटनांना दिला उजाळा; जाणून घ्या निरोपाच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Parliament Special Session : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आता नवीन संसदेचे कामकाज सुरू होणार आहे. तत्पूर्वी जुन्या संसदेला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील अनेक ऐतहासिक घटनांना उजाळा दिला. यावेळी त्यांनी देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते आतापर्यंतच्या कार्यकाळापर्यंत घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख केला. तसेच, अनेक गौरवपूर्ण आठवणींना उजाळा देत, संसदेच्या सभागृहाचे महत्त्वदेखील सांगितले. पाहूया यावरील सविस्तर रिपोर्ट

  PM Modi Farewell Speech at Old Parliament House : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसद कामकाजाची सुरुवात होणार आहे. यावेळी त्यांनी जुन्या संसद भवनाला निरोप देताना अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला. संसदेचे पाच दिवसीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी जुन्या इमारतीत कामकाज झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चर्चेला सुरुवात केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, देशाच्या प्रथम पंतप्रधानांपासून ते आताच्या लोकसभेच्या अध्यक्षांपर्यंत अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला.

  दोन्ही सभागृहांचे कामकाज नवीन संकुलात

  गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उद्या मंगळवारपासून दोन्ही सभागृहांचे कामकाज नवीन संकुलात हलवण्यात येणार असल्याने पंतप्रधान मोदींचे लोकसभेतील जुन्या संसद भवनातील हे शेवटचे भाषण होते. यावेळी नरेंद्र मोदी भावूकदेखील झाले होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला.

  नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  नरेंद्र मोदी म्हणाले, सदनाचा निरोप हा खूप भावनिक क्षण आहे, जर एखादे कुटुंब जुने घर सोडून नवीन घरात गेले, तर अनेक आठवणी काही क्षणांसाठी हादरून सोडतात. हे सदन सोडताना आपले मन भरून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

  देशाच्या संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे स्मरण

  पंतप्रधान मोदी यांनी नवीन संसद भवनात जाण्यापूर्वी देशाच्या संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे स्मरण केले. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत. यामध्ये देशवासीयांचा घाम गाळला गेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी हे घर इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे आसन होते. स्वातंत्र्यानंतर या वास्तूला संसद भवनाची ओळख मिळाली. जुनी संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.

  चांद्रयान-३ च्या यशाने संपूर्ण देश भारावला

  नरेंद्र मोदी म्हणाले, जगात सर्वत्र भारताची चर्चा होत आहे. चांद्रयान-३ च्या यशाने संपूर्ण देश भारावून गेला आहे. यामध्ये भारताच्या क्षमतेचे एक नवीन रूप विज्ञानाशी जोडले गेले आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, आपल्या शास्त्रज्ञांची क्षमता आणि देशातील १४० कोटी लोकांच्या सामर्थ्याशी जोडलेल्या भारताच्या सामर्थ्याचे एक नवीन रूप अधोरेखित केले. आज मी पुन्हा एकदा आपल्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करू इच्छितो.

  G20 चे यश हे देशातील 140 कोटी नागरिकांचे

  आज तुम्ही एकमताने G20 च्या यशाचे कौतुक केले आहे. मी तुमचे आभार व्यक्त करतो. G20 चे यश हे देशातील 140 कोटी नागरिकांचे आहे. हे भारताचे यश आहे, व्यक्ती किंवा पक्षाचे नाही. आपण सर्वजण साजरा करूया. भारताकडे G20चे अध्यक्षपद होते. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बर्‍याच लोकांची भारताविषयी शंका घेण्याची प्रवृत्ती आहे आणि हे स्वातंत्र्यानंतरही सुरूच आहे. यावेळीही (जी20 चा संदर्भ देऊन) कोणतीही घोषणा होणार नाही, असा विश्वास त्यांना होता.

  परकीय राज्यकर्त्यांचा निर्णय

  जुन्या संसद भवनाविषयी बोलताना मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर तिला संसद भवनाची ओळख मिळाली. ही वास्तू बांधणे हा परकीय राज्यकर्त्यांचा निर्णय होता हे खरे असले तरी याच्या बांधण्यासाठी घाम, मेहनत आणि पैसा माझ्या देशवासियांचा आहे. आपण नवीन संसदेत प्रवेश करणार आहोत मात्र जुनी इमारत येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

  ही भारताची लोकशाही 

  नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा संसद सदस्य झालो आणि खासदार म्हणून या इमारतीत पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा स्वाभाविकपणे मी या इमारतीच्या दारात गेलो. पण ज्या क्षणी मी डोकं झुकवून पहिलं पाऊल टाकलं तो क्षण माझ्यासाठी भावनांनी भरलेला होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या गरीब कुटुंबातील एक मूल कधी संसदेत येऊ शकेल याची कल्पनाही केली नव्हती. परंतु, ही भारताची लोकशाही होती, त्यामुळे एका गरीब कुटुंबातील मुलगा देशाच्या संसदेपर्यंत पोहचला. मला लोकांकडून इतकं प्रेम मिळेल, असे कधीच वाटले नव्हते.

  ही संसद ‘परिवार भव’ची साक्षीदार

  या वास्तूला निरोप देणे हा एक भावनिक क्षण आहे. अनेक कडू-गोड आठवणी याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. आपण सर्वांनी संसदेत मतभेद आणि वाद पाहिले आहेत, पण त्याचबरोबर ‘परिवार भव’चे साक्षीदार आहोत.

  आपल्या जिवंत आत्म्यावरील हल्ला

  संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. हा एखाद्या इमारतीवर झालेला हल्ला नव्हता. एकप्रकारे हा लोकशाहीच्या मातेवर, आपल्या जिवंत आत्म्यावर हल्ला होता. ती घटना देश कधीही विसरू शकत नाही.