युक्रेन युद्धानंतर रशियाकडून आयात ५ पटीने वाढली, थर्मल कोळसा खरेदीत वाढ

    नवी दिल्ली – रशिया-युक्रेन युद्धानंतर युरोप-अमेरिकेसह जगातील अनेक देश रशियावर बहिष्कार घालत असताना भारत आणि चीनसारख्या देशांसाठी स्वस्त दरात वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या वर्षी मे महिन्यात रशिया सौदी अरेबियाला मागे टाकत भारताला कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार बनला होता आणि आता जुलैमध्ये कोळशाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे.

    कन्सल्टन्सी फर्म कोल मिंटच्या मते, रशियाकडून कोळशाची एकूण आयात जुलैमध्ये जूनच्या तुलनेत २०% वाढून विक्रमी २० लाख ६० हजार टन झाले. रशिया युक्रेन युद्धानंतर भारताची रशियाकडून आयात सुमारे पाच पटीने वाढून १.१९ लाख कोटी रुपयापेक्षा अधिक झाली. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोळसा उत्पादक असूनही भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार आणि ग्राहकही बनला आहे. नुकतेच काही महिन्यांत रशियन पुरवठादारांनी भारतीय ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे थर्मल कोळसा खरेदीत वाढ झाली आहे, ज्याचा उपयोग मुख्यत्वे वीज निर्मितीमध्ये होतो.