पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला सहजरित्या पेन्शन मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया

केंद्र सरकारनं पेन्शनधारक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणार निर्णय घेतला आहे. एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शनसाठी करावी लागणारी धावपळ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेन्शनसंदर्भातील नियम शिथील करण्यात आले आहेत. पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर निवडक कागदपत्र जमाक करुन त्यांचे नातेवाईक मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.

  नवी दिल्ली : केंद्र सरकारनं पेन्शनधारक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणार निर्णय घेतला आहे. एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शनसाठी करावी लागणारी धावपळ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेन्शनसंदर्भातील नियम शिथील करण्यात आले आहेत.

  पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर निवडक कागदपत्र जमाक करुन त्यांचे नातेवाईक मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. कौटुंबिक पेन्शन संदर्भातील प्रकरण लवरकरात लवकर सोडवण्यासाठी सरकारनं बँकाना देखील निर्देश दिले आहेत. कौटुंबिक पेन्शन मिळणाऱ्या कुटुंबातील पती आणि पत्नीला विविध कागदपत्र जमा करावी लागतात. याशिवाय अन्य काही बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे पेन्शन संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ निघून जातो. या समस्या दूर करण्यासाठी मनुष्यबळ आणि पेन्शन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागानं बँकांना लवकरात लवकर नियमांमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे.

  कागदपत्रांची गरज आहे का?

  पती आणि पत्नी, किंवा पेन्शनधारकाच्या पीपीओमध्ये नाव नोंदवलेल्या कुटुंबातील व्यक्तीला पेन्शन मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज आहे. पती आणि पत्नीचं संयुक्त खातं असेल आणि पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास तर एक अर्ज, मृत्यू प्रमाणपत्र, पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तीला जारी करण्यात आलेल्या पीपीओच्या प्रती, अर्जदाराचा वयाचा दाखला, जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत सादर करण्याची गरज आहे. ही कागदपत्रे सादर केल्यानंतर पडताळणी केली जाईल. यानंतर पेन्शनधारकाच्या नातेवाईकांना पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.

  तसेचं काही वेळा पेन्शनधारकाचं खातं हे संयुक्त नसतं. त्यावेळी काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. कौटुंबिक पेन्शन मिळवण्यासाठी दोन साक्षीदारांच्या सहीनं फॉर्म क्र. 14 सादर करावा लागतो. मृत्यू झालेल्या पेन्शनधारकाचं मृत्यू प्रमाणपत्र, पेन्शनधारकाला जारी करण्यात आलेल्या पीपीओची प्रत, अर्जदाराचा जन्म दाखला, वय दर्शवणारी कागदपत्रं सादर करावी लागतील. ही सर्व कागदपत्रं स्वयंसाक्षांकित करावी लागतील.

  दरम्यान पेन्शनधारक पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्यास कौटुंबिक पेन्शन कुटुंबातील अन्य सदस्यांना पेन्शन द्यावी लागते. यामध्ये पीपीओमध्ये कुटुंबातील अन्य व्यक्तीचं पीपीओमध्ये नामनिर्देशन केलेलं असणं आवश्यक आहे. जर पीपीओमध्ये कुटुंबातील सदस्याचं नाव नसेल तर नवीन पीपीओ साठी त्यांना पेन्शन कार्यालयाशी संपर्क करावा लागेल. यासाठी पेन्शनधारकानं जिथे सेवा केली असेल तिथं भेट द्यावी लागेल.