Water Battelच्या तयारीत चीन, अरुणाचलपासून 30 किमी अंतरावर बांधतोय सर्वात मोठं धरण, भारत-बांग्लादेशला कृत्रिम पुराचा धोका ?

चीनच्या या हालचाली केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर, सरकारनंही हालचाली वेगानं सुरु केल्या आहेत. ब्रह्मपुत्र नदीवर प्रस्तावित 3 योजना गतीनं पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यात येतायेत. या योजनेच्या अंतर्गत ब्रह्मपुत्र नदीवर चार ठिकाणी मोठी धरणं बांधण्यात येणारेत.

    इटानगर- बह्मपुत्र नदीच्या प्रवाहाला मनमानी पद्धतीनं वळवण्याचा प्रयत्न चीन गेल्या 11 वर्षांपासून करीत आहे. मात्र यावेळी चीननं वेगळीच चाल खेळलीय. अरुणाचल प्रदेशात LAC प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 30 किमी अंतरावर चीनने सगळ्यात मोठ्या धरणाच्या कामाला सुरुवात केलीय. सध्या चीनमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या थ्री-जॉ़र्ज या धरणापेक्षाही हे धरण मोठं असणार आहे. या धरणाची उंची 181 मीटर असून अडीच किमी अंतर त्याची रुंदी असणार आहे. या धरणाची लांबी किती असेल याचा अंदाज अद्याप आलेला नाही. मेडोग बॉर्डर पॉईंटजवळ हे धरण बांधण्यात येतंय. यातून 60 हजार मेगा वॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याच ठिकाणाहून ब्रह्मपुत्र नदी भारतात प्रवेश करते.

    केंद्र सरकारही अलर्ट मोडवर
    चीनच्या या हालचाली केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर, सरकारनंही हालचाली वेगानं सुरु केल्या आहेत. ब्रह्मपुत्र नदीवर प्रस्तावित 3 योजना गतीनं पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यात येतायेत. या योजनेच्या अंतर्गत ब्रह्मपुत्र नदीवर चार ठिकाणी मोठी धरणं बांधण्यात येणारेत. यातील एका धरणाला अद्याप वेगवेगळ्या मंत्रालयांची परवानगी मिळणं बाकी आहे.

    चीनचा हेतू वॉटर बॅटल ?
    येत्या काही दिवसांत या चारही धरणांना केंद्रीय पर्यावरण खात्याकडून परवानगी देण्यात येईल, अशी माहिती आहे. चीनने या मोठ्या धरणाच्या माध्यमातून पाणी युद्ध सुरु केलं तर भारताला मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या योजना येत्या ३ वर्षांत पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलंय. सुरक्षेच्या कारणास्तव या योजनांच्या सद्यस्थितीची माहिती जाहीर करण्यात येत नाहीये.

    चीनने 11 वर्षांत ब्रह्मपुत्र नदीवर बांधले 11 डॅम
    ब्रह्मपुत्र नदीवर सर्वात मोठं धरण चीननं जांगमूत बांधलं आहे. तिबेटच्या 8 शहरांतही धरणांची काम सुरु आहेत. काही ठिकाणी धरणं बांधून तयारही झालीयेत.

    मेडोग प्रकल्पातून भारताला का धोका?
    जगातील सर्वात मोठी आणि उंच नदी अशी ओळख असलेली ब्रह्मपुत्र ईशान्य भारतातून बांग्लादेशात जाते आणि तिथून समुद्राला मिळते. या सगळ्यात प्रवासात 8858 फूटांचं खोरं ती निर्माण करते. चीनने कधी या धरणाची दारं उघडली तर भारत आणि बांग्लादेशमध्ये कृत्रिम पुराची स्थिती निर्माण होऊ शकते, हा मोठा धोका आहे.