H3N2 व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ‘या’ कालावधीत शाळा राहणार बंद; शिक्षणमंत्र्यांनी घोषणा

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले होते. रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ चिंतेचा विषय बनली होती. त्यानंतर या महामारीनंतर (Coronavirus Pandemic) आता H3N2 विषाणूचा फैलाव होत आहे.

पुद्दुचेरी : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले होते. रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ चिंतेचा विषय बनली होती. त्यानंतर या महामारीनंतर (Coronavirus Pandemic) आता H3N2 विषाणूचा फैलाव होत आहे. H3N2 व्हायरसच्या केसेसमध्ये वाढ झाल्याने सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता पुद्दुचेरीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री ए. नमशिवम यांनी केली.

H3N2 प्रकरणाची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे विशेष पावले उचलली जात आहे. केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा 16 मार्च (गुरुवार) ते 26 मार्च (रविवार) या कालावधीत बंद राहतील, अशी घोषणा शिक्षणमंत्री ए. नमशिवम यांनी केली. 11 मार्चपर्यंत पुद्दुचेरीमध्ये इन्फ्लूएंझाची 79 प्रकरणे आढळून आली आहेत. जे व्हायरल H3N2 सब-व्हेरियंटशी संबंधित आहेत. आतापर्यंत केंद्रशासित प्रदेशात H3N2 संबंधित कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. असे असताना राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना या साथीच्या आजारामुळे घाबरू नये, असा सल्ला दिला आहे.

H3N2 व्हायरसची लक्षणे काय?

H3N2 व्हायरसची विविध लक्षणे आहेत. यामध्ये थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, काही काम केल्यास चक्कर येणे, खूप ताप येणे, थंडी वाजणे याशिवाय घशात कफ जमा होतो. शिंका येण्याबरोबरच श्वास घेण्यास त्रास होतो. डोक्याशिवाय स्नायूंमध्येही वेदना होतात. त्वचा निळी होते, अशी लक्षणे यामध्ये जाणवतात.

आरोग्यव्यवस्था सज्ज

यासोबतच वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयांमध्ये विशेष ओपीडी बूथ उघडण्यात आले असून, इन्फ्लूएंझा विषाणूची लक्षणे असलेल्या लोकांवर उपचारही उपलब्ध आहेत. आरोग्य व्यवस्था सज्ज असल्याचे सांगण्यात आले.