कोरोनाने पुन्हा डोकं काढलं वर! गेल्या 24 तासात 3,095 रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू

गुरुवारी आढळलेल्या या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4.47 कोटीवर गेली आहे तर आतापर्यांत 5.30 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे  (Corona) रुग्ण वाढताना दिसत आहे.  गेल्या आठवडाभरात नव्या रुग्णांची संख्या आता दुप्पट झाली आहे.  गेल्या 24 तासात देशात 3,095 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गोवा-गुजरातमधील प्रत्येकी एक आणि केरळमधील तीन रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी आढळलेल्या या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4.47 कोटीवर गेली आहे तर आतापर्यांत 5.30 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 1.91 टक्के नोंदवण्यात आला आहे.

गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात तीन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. ही कोरोना वाढ गेल्या सहा महिन्यांत  सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येता आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे ६९४ रुग्ण आढळले. तर, गुरुवारी राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक सकारात्मकतेची नोंद झाली आहे. ज्यांचा सकारात्मकता दर गुरुवारी 12 टक्के होता. मुंबईत कोरोनाचे 192 नवीन रुग्ण आढळले असून, शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 846 वर पोहोचली आहे.