गावात जागोजागी आगीच्या घटना, भूताच्या अफवेने लोक दहशतीत; वास्तव समोर आल्यानंतर लोकांना धक्काच बसला

आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात एका १९ वर्षीय तरुणीने आईच्या वागणुकीला कंटाळून जवळपास महिनाभर गावातच वेगवेगळ्या ठिकाणी आग लावून अख्ख्या गावाला हैराण करुन सोडलं. सोमवारी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

  तिरुपती : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात एका १९ वर्षीय तरुणीने आईच्या वागणुकीला कंटाळून जवळपास महिनाभर गावातच वेगवेगळ्या ठिकाणी आग लावून अख्ख्या गावाला हैराण करुन सोडलं. सोमवारी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

  आपल्याप्रती आईची वागणूक सुधारण्यासाठी आणि कुटुंबाला दुसऱ्या गावी जाण्यास भाग पाडण्यासाठी कीर्ती नावाच्या मुलीने ठिकठिकाणी जाळपोळ केली. तिला गाव सोडून जायचे होते.

  दरम्यान आगीच्या घटनांमुळे तिच्या कुटुंबातील सदस्य अंधश्रद्धेमुळे गाव सोडतील, असं किर्तीला वाटलं होतं. त्यामुळे तिने आपल्या कुटुंबातील लोकांचे कपडे जाळण्यास सुरुवात केली. कपड्यां व्यतिरिक्त तिने काही गवताच्या ढिगाऱ्यांनाही आग लावल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे काही रहिवाशांनी स्थानिक आमदार, पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यासोबतच गावाला कोणत्या कथित शापापासून मुक्त करण्यासाठी तसेच, देवांना शांत करण्यासाठी विधीही केले जात होते, अशी माहिती तिरुपती जिल्ह्याचे एएसपी जे वेंकट राव यांनी दिली.

  किर्तीने पोलिसांना दिली कबूली

  कीर्तीने स्वतःच्या घरात तीन वेळा कपडे जाळण्याव्यतिरिक्त शेजाऱ्यांच्या घरीही असेच केले. ती तिच्या आईवर इतकी नाराज होती की तिने झोपेत असताना तिची साडी देखील जाळली. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. गावकऱ्यांची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गावात पहारा देत दक्षता वाढवली. त्याचवेळी पोलिसांना कीर्तीवर संशय आल्याने तिची चौकशी करण्यात आली. यावेळी तिने गेल्या एक महिन्यापासून गावातील विविध ठिकाणी जाळपोळ केल्याची कबुली दिली.

  किर्तीविरुद्ध गुन्हा दाखल

  कीर्तीने मित्र बोलत नसल्याच्या मूर्खपणाच्या कारणावरूनही जाळपोळ करण्यास सुरुवात केली होती. असं तपासातून समोर आलं, याशिवाय, पोलिसांनी जळालेले साहित्य फॉरेन्सिक सायन्सेस लॅबोरेटरीकडे (एफएसएल) पाठवले असून, त्या घटनांमध्ये कोणतेही केमिकल वापरण्यात आले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पोलिसांनी किर्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. कीर्तीने आईकडून चोरलेले तीस हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले.