chandrayaan landing

भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) नं यशस्वी लँडिंग केलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.

    इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत शिरलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेली आहेत.

    14 जुलैला पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने सुरु झाला प्रवास
    भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) नं यशस्वी लँडिंग केलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. गेल्या महिन्यात 14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.

    संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली भारताची चंद्रमोहिम यशस्वी ठरली आहे. प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून गेली आहे. चांद्रयान-2 मोहिमेत अपशय आल्यानंतरही भारतानं हार मानली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2020 मध्ये चांद्रयान-3 मोहिमेला इस्रोकडून सुरुवात करण्यात आली आणि त्याचं फळ आज मिळालं आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता यशस्वी उड्डाण केलं आणि आज या चांद्रयान-3 नं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केलं आहे.

    दक्षिण ध्रुवावर अंधार
    भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरलं आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. येथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे.