
सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.
देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 9 हजार 062 कोरोना ( Coronavirus Cases in India )रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या काही दिवसापासून 10 हजाराच्या वर जाणारा कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाल्याचं यावरुन दिसत आहे. जी दिलासादायक बाब आहे. तर, दुसरी दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
सध्या देशात किती सक्रिय रुग्ण?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशातील एकूण 4 कोटी 36 लाख 54 हजार 64 रुग्ण आतापर्यंत कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासात 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत मंगळवारी 332 रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 332 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत मंगळवारी 477 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,08,767 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,666 झाली आहे. सध्या मुंबईत 5,071 रुग्ण आहेत.