India-nepal-rail-service

नेपाळमध्ये पहिल्यांदा रेल्वेमार्ग (Railway In Nepal) कोण सुरु करणार, हा भारत आणि चीनसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. दोन्ही देशांना नेपाळच्या सरकारवर आपला प्रभाव हवा आहे. भारतानं यात चीनला मात दिली.

  काठमांडू: भारत (India) आणि चीनच्या (China) युद्धात युद्धभूमी ठरलेल्या नेपाळमध्ये चीनच्या नापाक इराद्यांवर भारतानं मोठी मात केली आहे. रक्सौल ते काठमांडू (Railway In Kathmandu) या रेल्वे मार्गाचं अंतिम सर्वेक्षण वेगाने करण्यात येतंय. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर रेल्वे चालवण्याचा रस्ता मोकळा होणार आहे. भारतानं या सगळ्यात वेगाने काम सुरु केल्यावर चीनही जागा झाला असून, त्यांनीही त्यांच्या चाली टाकायला सुरुवात केलीय. चीनने आता केरुंग ते काठमांडू अशा रेल्वे मार्गाच्या शक्यतेवर विचार करायला सुरुवात केली असल्याचं सांगण्यात येतंय. के पी ओली यांचे बहुमताचे सरकार नेपाळमध्ये आल्यानंतर आता चीनने हालचाल करण्यास सुरुवात केलीय.

  नेपाळला कर्जाच्या विळख्यात अडकवण्याचा कट
  चीन अब्जावधी डॉलर्सच्या माध्यमातून नेपाळमध्ये रेल्वे मार्ग उभारण्याच्या तयारीत आहे. श्रीलंकेप्रमाणे नेपाळलाही कर्जाच्या विळख्यात अडकवण्याचा चीनचा इरादा असल्याचं आंतरराष्ट्रीय अभ्यासक सांगतायेत. चीनची प्रस्तावित रेल्वे लाईन ही हिमालयातून टाकण्याचा विचार आहे. यासाठी खूप मोठा निधी आणि तांत्रिक साधनांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतरही या ठिकाणी रेल्वे सेवा सुरु ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरजही भासणार आहे. बेल्ट अँड रोड या योजनेतून हा रेल्वेमार्ग उभारण्याचा चीनचा मानस आहे. हा सगळा खर्च नंतर चीन नेपाळकडून वसूल करेल. तर चीनने कर्ज न देता आर्थिक सहकार्य करावे, असा सूर नेपाळनं लावलेला आहे. मात्र यासाठी चीन तयार नसल्याचं सांगण्यात येतंय.

  भारतानं केली चीनवर मात
  नेपाळमध्ये पहिल्यांदा रेल्वेमार्ग कोण सुरु करणार, हा भारत आणि चीनसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. दोन्ही देशांना नेपाळच्या सरकारवर आपला प्रभाव हवा आहे. भारतानं यात चीनला मात दिली असून, बिहारच्या रक्सौल ते काठमांडू या रेल्वेमार्गाचं फिल्ड वर्क भारतीय रेल्वेनं पूर्ण केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनीच दिली आहे. कोकण रेल्वेच्या वतीनं हा रेल्वेमार्ग विकसीत करण्याची योजना आहे.

  चीनचं बाहुलं असणारे के पी ओली हे २०१६ साली चीनच्या दौऱ्यावर गेले असताना बिजींगमध्ये दोन्ही देशांमध्ये रेल्वेमार्गाबाबत करार झाला होता. भारताला ही माहिती मिळाल्यानंतर, भारतानंही गतीनं पावलं टाकली. त्यानंतर रक्सौल ते काठमांडू हा प्रस्ताव नेपाळला देण्यात आला. २०१८ साली या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या रेल्वेमार्गासाठी भारत नेपाळला आर्थिक मदत करणार आहे. तर दुसरीकडे चीन ते नेपाळ या रेल्वेमार्गासाठी ३ अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. चीनला या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी सुमारे ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे.