चिंता वाढवणारी बातमी, ‘या’ कारणांमुळे भारतीयांचे आयुर्मान होतंय कमी

भारतीयांचे आयुर्मान पाच वर्षांनी (Life Expectancy Reducing In India) कमी होण्याची शक्यता आहे. वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) भारतीयांचे आयुर्मान कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

    भारतीयांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. आगामी काळात भारतीयांचे आयुर्मान पाच वर्षांनी (Life Expectancy Reducing In India) कमी होण्याची शक्यता आहे. वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) भारतीयांचे आयुर्मान कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) (EPIC) यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे.

    या अहवालात म्हटले आहे की, “नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात लोक मोठ्या प्रमाणात प्रदुषित भागांमध्ये राहतात. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असून हवेची गुणवत्ता खूप खराब झाली आहे.”

    भारत जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश
    भारतातील मानवी आरोग्यासाठी वायू प्रदूषण हा सर्वात मोठा धोका आहे. दिल्ली हे भारतातील सर्वात जास्त प्रदूषित राज्य आणि भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश आहे. भारतात २०२० साली खराब हवेमुळे नागरिकांचे आयुर्मान ६.९ वर्षांनी कमी झाले. नेपाळचे (४.१ वर्षे), पाकिस्तान (३.८ वर्षे) आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोतील लोकांचे आयुष्य २.९ वर्षांनी कमी झाले आहे. ईपीआयचीच्या निष्कर्षांनुसार, शेजारील बांग्लादेशने जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या पातळीवर हवेचा दर्जा सुधारल्यास तेथील सरासरी आयुर्मान ५.४ वर्षांनी वाढू शकते.

    ईपीआयसीच्या अहवालानुसार, सुक्ष्म असे कण बराच वेळ हवेत तरंगत राहतात आणि श्वासनलिकेद्वारे शरीरात जातात. त्यामुळे अनेक रोग होऊ शकतात. गेल्या दोन दशकांमध्ये जगभरातील कणांसंबंधी पदार्थांच्या उर्त्सजनात मोठी ६१.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे २.१ वर्षांच्या सरासरी आयुर्मानात आणखी घट झाली आहे. जगभरातील प्रदूषणात २०१३ पासून  सुमारे ४४% वाढ भारतात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे ४०%, सध्याचे प्रदूषण स्तर कायम राहिल्यास, सरासरी ७.६ वर्षे आयुर्मान भारतीय गमवू शकतात. तसेच प्रदूषणाची पातळी कायम राहिल्यास लखनौच्या रहिवाशांचे आयुर्मान ९.५ वर्षे कमी होईल असेही संशोधनातून समोर आले आहे.