इंडिगो फ्लाइटचा अपघात टळला, दिल्ली विमानतळावर विमानाच्या चाकाखाली आली कार

    नवी दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी मोठा अपघात टळला. येथे इंडिगोच्या फ्लाइटसमोर कार आली होती. गाडी विमानाच्या चाकाखाली येऊन थांबली. ही कार गो फर्स्ट कंपनीची होती. विमानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

    इंडिगो विमान ६E२००२ दिल्लीहून पाटण्याला जाण्यासाठी तयार होते. विमानात अनेक प्रवासी होते, तर काही जण त्यात चढत होते. दरम्यान, एक कार भरधाव वेगात आली आणि विमानाच्या चाकाखाली येऊन थांबली. हे पाहून तेथे एकच गोंधळ उडाला.

    सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेत चालकाला पकडले. ताबडतोब कार विमानाच्या खालून काढण्यात आली आणि विमान योग्य वेळी रवाना करण्यात आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कार चालकाला ताब्यात घेऊन त्याची अल्कोहोल चाचणी केली. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. विमानतळ आणि सुरक्षा अधिकारी कार चालकाची चौकशी करत आहेत. कार विमानाला धडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता.