जपाननंतर दक्षिण कोरियाने मोदी सरकारला दिला दणका; जाणून घ्या नेमकं झालं काय?

जी-20 (G-20) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी जपाननंतर आता दक्षिण कोरियानेही (South Koria) भारताला धक्का दिला आहे. ही बैठक बुधवारपासून सुरू होत आहे. दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री देशांतर्गत जबाबदाऱ्यांमुळे G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात येणार नाहीत. यापूर्वी जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी (Yoshimasa Hayashi) यांनीही जी-20 बैठकीऐवजी संसदीय कामकाजाला प्राधान्य देत भारतात येण्यास नकार दिला आहे.

नवी दिल्ली : जी-20 (G-20) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी जपाननंतर आता दक्षिण कोरियानेही (South Koria) भारताला धक्का दिला आहे. ही बैठक बुधवारपासून सुरू होत आहे. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतातील G-20 बैठकीला येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी देशांतर्गत जबाबदाऱ्यांमुळे G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात येणार नसल्याचे कारण दिले आहे. यापूर्वी जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी (Yoshimasa Hayashi) यांनीही जी-20 बैठकीऐवजी संसदीय कामकाजाला प्राधान्य देत भारतात येण्यास नकार दिला आहे. हा एकप्रकारे भारताला दणका असल्याचे म्हटले जात आहे.

जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उप परराष्ट्रमंत्री केंजी यामादा या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी, राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की, देशांतर्गत कामकाजात व्यस्त असल्याने त्यांचे परराष्ट्रमंत्री भारतात होणाऱ्या G-20 बैठकीत सहभागी होणार नाहीत. रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या तटस्थ भूमिकेमुळे G-20 च्या सुरुवातीपासूनच भारतावर दबाव आणला जात आहे.

युक्रेनच्या मुद्द्यावरून मतभेद आणि महत्त्वाच्या देशांचे परराष्ट्रमंत्री या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे संयुक्त निवेदन जारी करण्याबाबतही अनिश्चितता आहे. या बैठकीला येण्यापूर्वीच रशिया आणि युरोपीय संघाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेन युद्धाबाबत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतासाठी हा दणका का?

G-20 सारख्या महत्त्वाच्या परिषदेत जपान आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री भारतात न येणे हा धक्का मानला जात आहे. कारण जपान हा भारताचा जवळचा मित्र आहे आणि यावर्षी जपान वार्षिक G-7 गटाचे अध्यक्षपदही भूषवत आहे. त्याचवेळी, दक्षिण कोरिया भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. त्यामुळे भारतात होत असलेल्या G-20 परिषदेत जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांची अनुपस्थितीचा आता वेगळाच अर्थ लावला जात आहे.

युक्रेन युद्धामुळे संबंधांमध्ये फरक

भारत आणि जपान हे जवळचे मित्र आहेत. पण युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशांच्या राजकीय स्तरावर मतभेद निर्माण झाले आहेत. युक्रेन युद्धामुळे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा रशियाबाबत कठोर भूमिका घेत असून, त्यांनी पाश्चात्य देशांप्रमाणे रशियावर निर्बंध लादले आहेत.