कानपूरच्या सर्वात मोठ्या कापड बाजाराला लागली आग! 6 कॉम्प्लेक्समधील 800 हून अधिक दुकानं भस्म, लष्कर आलं मदतीला

पहिल्या मजल्यावरील दुकानात शॉर्टसर्किटने आग लागली, जी हळूहळू वरच्या मजल्यावरील दुकानांमध्ये पसरली. यामुळे अनेक दुकांनाता प्रंचड नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

कानपूर : मध्यप्रदेशमधील इंदूरमध्ये काल रामनवमीच्या दिवशी मंदिरात दुर्घटना झाल्याने तब्बल 35 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता  कानपूरमधुनही एक भीषण दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. कानपूरमधील बनसमंडी येथील हमराज मार्केटजवळील एआर टॉवरला भीषण आग लागली. रात्री उशिरा झालेल्या आगीने भीषण रूप धारण करत तब्बल 6 कॉम्प्लेक्समधील 800 हून अधिक दुकानांना आपल्या कवेत घेतलं. या दुर्घटनेत एका 10 अब्जाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

कशी लागली आग

उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठे रेडिमेड होलसेल मार्केट अशी ओळख असलेल्या कानपूरमधील बनसमंडी परिसरातील मार्केटमधे गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याच सांगण्यात येत आहे. सुमारे सहा तासांपासून ही आग अद्यापही धगधगत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच कॉम्प्लेक्स आगीत जळून खाक झाल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. सध्या आग आटोक्यात आल्यानंतर आगीच्या कारणाचा सविस्तर तपास केला जाईल, असं पोलिसांचे सांगितलं. 

आगीमुळे अनेक दुकाने जळून खाक

बनसमंडीतील हमराज कॉम्प्लेक्सच्या पुढे चार मजली एआर टॉवर आहे, ज्यामध्ये दोन डझनहून अधिक रेडिमेड कपड्यांची दुकाने आहेत. पहिल्या मजल्यावरील दुकानात शॉर्टसर्किटने आग लागली, जी हळूहळू वरच्या मजल्यावरील दुकानांमध्ये पसरली. यामुळे अनेक दुकांनाता प्रंचड नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

लष्कराला केलं पाचारण

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कानपूरचे आयुक्त घटनास्थळी हजर आहेत. आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनही मदत घेतली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्यामुळे आग विझवण्यात अडचण येत आहे. हवाई दल, लष्कर, सीओडी, अध्यादेशाची वाहनेही घटनास्थळी पोहोचली आहेत. आग लवकरच आटोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या तरी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.