भाजपवर टीका करताना सिद्धरामय्या यांनी केलं वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘भाजप…’

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केंद्र सरकार हे गरीब विरोधी आणि भांडवलदारांचे सरकार असल्याचे वर्णन केले.

    बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केंद्र सरकार हे गरीब विरोधी आणि भांडवलदारांचे सरकार असल्याचे वर्णन केले. सिद्धरामय्या इतके संतापले की, त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला ‘नीच’ संबोधले आहे. केंद्र सरकारने राज्याला अतिरिक्त तांदूळ पुरवठा करण्यास नकार दिल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

    सिद्धरामय्या म्हणाले, मागील कार्यकाळात मी मुख्यमंत्री असताना लोकांना 7 किलो तांदूळ मोफत मिळत होते. पण भाजपा सत्तेत येताच त्यांनी ते 4-5 किलो केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी अतिरिक्त 5 किलो तांदूळ देईन, असे आश्वासन दिले होते. या योजनेसाठी राज्य सरकारने केंद्राकडे तांदूळ पुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी ते नाकारले.

    सिद्धरामय्या पुढे म्हणाले, आमचे सरकार आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्यात तांदूळ पुरवठ्यासाठी करार झाला होता. परंतु, केंद्राने आम्हाला तांदूळ देण्यास नकार दिला. आम्ही फुकट तांदूळ मागितला नाही, आम्ही पैसे द्यायला तयार होतो. असे असतानाही केंद्र सरकारच्या हेकेखोर भूमिकेमुळे गरिबांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. त्यामुळेच ते किती क्षुद्र आणि गरीब विरोधी आहे. तसेच त्यांच्यात माणुसकी नाही, हे दिसून येते.

    पाच हमी योजना राबवणारच

    मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही आमच्या पाच हमी योजना राबवू आणि राज्याचे दिवाळखोरी होऊ देणार नाही. कर्नाटकात सतेवर आल्यावर महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील एका महिलेला दरमहा 2 हजार रुपये, प्रत्येक घरात 200 युनिट मोफत वीज आणि अन्नधान्य देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. गृह ज्योती योजनेंतर्गत भाग्य योजनेंतर्गत प्रत्येक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला 10 किलो तांदूळ मोफत दिला जाईल.