कर्नाटकातील प्रचार अखेरच्या टप्प्यात शिगेला; बजरंगबली, टिपू सुलतान, सावरकर, दहशतवाद या मुद्द्यांवर भाजपाकडून प्रचार, तर खर्गेंच्या कुटुंबाला मारण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांसाठी (Karnataka Legislative Assembly Elections) सुरु असलेला प्रचार हा अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. भाजपाकडून (BJP) हा प्रचार हिंदुत्वाच्या दिशेनं नेण्यात येत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

    बंगळुरु : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांसाठी (Karnataka Legislative Assembly Elections) सुरु असलेला प्रचार हा अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. भाजपाकडून (BJP) हा प्रचार हिंदुत्वाच्या दिशेनं नेण्यात येत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) हा मुद्दा प्रचारात आणलाय. रामानंतर आता बजरंगबलीवर बंदी घालण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय.

    तसचं ‘द केरल स्टोरी’ या सिनेमाचं कौतुक करताना काँग्रेसकडून राजकीय व्होटबँकेसाठी दहशतवादाला पाठिंबा दिला जात असल्याचंही ते जाहीरपणे म्हणाले आहेत. बंगळुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ किलोमीटरचा भव्य रोड शो केला आहे. या रोड शोमध्ये बजरंगबली पाहायला मिळालाय. दुसरीकडं भाजपा नेते हिंदुत्वाच्या जोरावर प्रचार करताना दिसतायेत. तर काँग्रेसकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट भाजपानं रचल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय.

    डी. के. शिवकुमार हे टीपू सुलतानचे वंशज

    भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा हे कर्नाटकात स्टार प्रचारक आहेत. त्यांनी काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार हे टिपू सुल्तान याचे वंशज असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. जर कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आलं तर पीएफआयसारख्या दहशतवादी संघटनांसाठी हे खोरं ठरेलं, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.

    अमित शाहांकडून सावरकरांचा उल्लेख

    काँग्रेस सातत्यानं स्वातंत्र्यवीरक सावरकरांचा अपमान करत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा प्रचारात करताना दिसतायेत. भाजपानं मराठा समाजाचा विकास केला आणि त्यांचा आदर करत असल्याचंही शाहा म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात राममंदिर उभं राहत असल्याचंही ते सांगतायेत. नरेंद्र मोदीच या देशाचं स्वप्न पूर्ण करु शकतील असं अमित शाहा सांगतायेत. काँग्रेस पक्षानं बजरंगबलीचा अपमान केल्याचं सांगत, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुणाचाच विश्वास नसल्याची टीका अमित शाहा यांनी केलीय. पीएफआयसारख्या दहशतवादी संघटनेवंर भाजपानंच बंदी घातली याचा पुनरुच्चारही अमित शाहा करीत आहेत. भाजपाचा प्रचार अखेरच्या टप्प्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होत असल्याचं दिसतं आहे. तर दुसरीकडं काँग्रेसनं भाजपावर खळबळजनक आरोप केला आहे.

    मल्लिकार्जुन खर्गे आणि कुटुंबीयांना मारण्याचा कट

    काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा कट भाजपानं रचला होता, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणजीतसिंह सुरजेवाला यांनी केला आहे. भाजपाचे चितापूरचे उमेदवार यांच्या फोन रेक़ॉर्डिंगमधून हे स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणालेत. हा उमेदवार पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जवळचा असल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान या आरोपाची चौकशी करण्यात येईल असं आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सरकारनं घएतली असून, यात कायदा त्याचं काम करेल असंही बोम्मई यांनी सांगितलंय.