कर्नाटकात लोकायुक्तांची मोठी कारवाई; एकाच वेळी 63 ठिकाणी छापेमारी, कोट्यवधींची मालमत्ताही जप्त

लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे राज्यातील 63 भागांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. बेकायदा मालमत्ता आणि लाच मागितल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी करण्यात आली.

    बंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे राज्यातील 63 भागांमध्ये एकाच वेळी छापे (Action of Lokayukta) टाकले. बेकायदा मालमत्ता आणि लाच मागितल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी करण्यात आली. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बंगळुरूमध्ये तीन ठिकाणी छापे (Raid Action) टाकले. या पथकाने बेस्कॉमचे दक्षता अधिकारी टी. एन. सुधाकर रेड्डी यांच्या घरावर आणि दूध उत्पादक सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. एस. कृष्णमूर्ती यांच्या घरावर छापा टाकला.

    म्हैसूरमध्ये नंजनगुड शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयाचे व्याख्याते महादेवस्वामी यांच्याशी संबंधित ठिकाणीही छापे टाकले आहेत. यासह गुरुकुल नगर निवाससह 12 ठिकाणी तपासणी केली. पी. सुरेश बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली लोकायुक्त एडीजीपी प्रशांत कुमार, आयजीपी सुब्रमणेश्वर राव, एस. डीएसपी कृष्णय्या यांचं पथक येथे अधिक तपास करत आहेत.

    तसेच बेल्लारी खाण आणि पृथ्वी विज्ञान विभागाचे अधिकारी चंद्रशेखर, वन विभागाचे डीआरएफओ मारुती, चंद्रशेखर यांच्या घरांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून, कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी कलबुर्गी शहरातील करुणेश्वर कॉलनीतील यादगिरी डीएचओ डॉ. प्रभुलिंगा मानकर यांच्या निवासस्थानावरही छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे.