कर्नाटकात येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक; बंजारा आणि भोवी समाजातील लोकांचे हिंसक आंदोलन

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्या घरावर आज दगडफेक करण्यात आली.

शिवमोगा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्या घरावर आज दगडफेक करण्यात आली.

कर्नाटक सरकारने एकीकडे मुस्लिम समाजाला दिलेले 4 टक्के आरक्षण रद्द केले. तर दुसरीकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणात विभागणी करण्याची शिफारस कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. या शिफारसीला बंजारा आणि भोवी समाजाने विरोध केला आहे. बंजारा आणि भोवी समाजातील लोकांनी येडियुरप्पा यांच्या शिवमोगा येथील घर आणि कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केली.

शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरामधील येडियुरप्पा यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीच्या या घटनेत पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या घटनेवर येडियुरप्पा यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘बंजारा समाजाच्या नेत्यांचा गैरसमज झाला आहे. मी एक-दोन दिवसांत त्यांच्याशी बोलेन आणि त्यांना मुख्यमंत्र्यांकडेही घेऊन जाईन. जेणेकरून त्यांच्या तक्रारी सोडवता येतील. बंजारा समाजाच्या लोकांनी मला मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे. मी एसपी आणि डीसी यांना कठोर कारवाई न करण्यास सांगितले आहे. या घटनेसाठी मी काँग्रेस किंवा इतर कोणालाही दोष देणार नाही’.

50 वर्षांपासून विकासासाठी काम करतोय

‘मी कोणालाही दोष देणार नाही’, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी या घटनेवर म्हटले आहे. मी या प्रकरणी बंजारा समुदायाच्या नेत्यांशी बोलणार आहे. गेल्या 50 वर्षांपासून शिकारीपुराच्या विकासासाठी काम करत आहेत. गैरसमजातून आंदोलन करण्यात आलं असेल, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करु नये, असे आवाहन केले आहे.