करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; हत्याकांडात लेडी डॉनचाही सहभाग

करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या लेडी डॉनला जयपूरमधून अटक करण्यात आली. याआधी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यात दोन शूटर्स आहेत.

    जयपूर : करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या लेडी डॉनला जयपूरमधून अटक करण्यात आली. याआधी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यात दोन शूटर्स आहेत. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

    गोगामेडी यांची 5 डिसेंबरला त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या म्हणजे एक पूर्वनियोजित कट होता, असे म्हटले जात आहे. जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, पूजा सैनी आणि तिचा नवरा महेंद्र मेघवाल या दोघांनी गोगामेडींच्या हल्लेखोरांना शस्त्रे पुरवली होती. नितीन फौजी, रोहित राठोड आणि उधम सिंग या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी फौजी हा पूजा सैनी आणि महेंद्र मेघवाल यांच्या घरात भाडे तत्त्वावर राहत होता. महेंद्र मेघवालचा साथीदार समीर फरार आहे.

    आरोपी गँगस्टर रोहित गोदाराच्या होते संपर्कात

    अतिरिक्त पोलिस आयुक्त कैलाशचंद्र बिश्नोई यांनी सांगितले की, 28 नोव्हेंबरच्या रात्री नितीन फौजी हा मेघवालला भेटण्यासाठी टॅक्सीने जयपूरला आला. त्यानंतर मेघवालने त्याला एका घरात भाडे तत्वावर ठेवले होते. हा भाग जगतपुरा येथील होता. मेघवाल आणि फौजी हे गँगस्टर रोहित गोदाराच्या संपर्कात होते. पूजा सैनी ही नितीन फौजीला जेवण बनवून द्यायची, तसेच कटातही तिचा सहभाग होता, असेही पोलिसांनी सांगितले आहे.