kiren rijiju

आम्ही संविधान स्वीकारत नाही असं सांगणं काही लोकांना फॅशनेबल वाटतं असल्याचा टोला केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju)यांनी संविधान दिनाच्या(Constitution Day 2021) पूर्वसंध्येला लगावला.

    केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju)यांनी संविधान दिनाच्या(Constitution Day 2021) पूर्वसंध्येलाच कायदा, संविधानाला पूर्ण जोर लावून विरोध करणाऱ्या काही लोकांवर टीका केली आहे. आम्ही संविधान स्वीकारत नाही असं सांगणं काही लोकांना फॅशनेबल वाटतं असल्याचा टोला रिजीजू यांनी लगावला. एका कार्यक्रमामध्ये बोलताना रिजीजू म्हणाले की, जेव्हा संसदेमध्ये एखादं विधेयक संमत होतं किंवा विधानसभेमध्ये काही कायदे संमत केले जातात तेव्हा आम्ही या अधिनियमानांचे (कायद्यांचे) पालन करणार नाही असं म्हणण्याची काहीच गरज नसते.

    रिजीजू यांनी मांडलेली ही मत हिवाळी अधिवेशनाच्या आधी एका कार्यक्रमात मांडली आहे. रिजीजू म्हणाले की, भारत एक लोकशाही देश असल्याने आपल्याला विरोध करण्याचा अधिकार आहे. वैचारिक मतभेद ठेवण्याचा अधिकारही आहे. समोरच्या व्यक्तीशी असहमत असल्याचा अधिकारही आपल्याला आहे. मात्र संविधानाच्या मार्गाने जे काही करण्यात आलं आहे त्या सर्वांचा सन्मान केला पाहिजे.

    (काही) अधिनियम संविधानानुसार आहेत की विरोधात याचा निर्णय न्यायव्यवस्थेला घेऊ द्या, असंही रिजीजू यांनी नमूद केलं. काही तत्वांसाठी आम्ही संविधान स्वीकारत नाही हे सांगणं फॅशन झाली आहे. काहीजण संविधान आमच्या बाजूने नाहीय असंही सांगतात.

    मागील काही काळापासून कृषी कायद्यांबरोबर सीएए, एनआरसीसारख्या कायद्यांनाही मोठा विरोध झाल्याचं पाहायला मिळालंय. कायदामंत्र्यांनी थेट कोणत्याही घटकाचे किंवा गटाचे नाव घेतले नाही. मात्र कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केल्याने त्याला वेगळं महत्व आहे.