बंगाल विनाशमुक्त करू; ७० वर्षात प्रत्येकाला संधी दिली आम्हाला पाच वर्षे द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बंगालने काँग्रेस, टीएमसी, डावे सर्वांना संधी दिली आहे. जर तुम्ही भाजपाला संधी दिली तर खरं परिवर्तन कसं असते हे आम्ही दाखवून देऊ. काँग्रेस आणि डाव्यांनी केलेला विनाश तुम्ही पाहिलात. टीएमसीने तुमच्या स्वप्नांचा चुराडा केला.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क,कोलकाता.

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर चढला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य भाजपा नेते तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जींवर घणाघाती हल्ला चढवित आहेत. खडगपूर येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ममतांवर घणाघाती टीका केली. बॅनर्जी व्होट बँकेच्या राजकारणासाठी तुष्टीकरणाचा खेळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

    दरम्यान, गेल्या ७० वर्षात तुम्ही प्रत्येकाला संधी दिलीत. पण आम्हाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला ७० वर्षांच्या विनाशातून मुक्त करु. तुमच्यासाठी आमच्या जीवाचं बलिदान देऊ, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

    राज्यात माफिया इंडस्ट्रीच सुरू

    जर आपण केंद्राच्या योजनांची अमलबजावणी केली तर लोक मोदींना आशीर्वाद देतील असे दीदींना वाटतं असे सांगत जर तुम्हाला मोदींनी क्रेडिट द्यायचे नाही तर नका देऊ पण गरिबांचा हक्क का हिरावून घेता? असा सवाल मोदींनी केला. राज्यात अनेक उद्योग मरणावस्थेत आहेत. फक्त एकच इंडस्ट्री सुरू आहे ती म्हणजे माफिया इंडस्ट्री, अशा शब्दात मोदींनी टीकास्त्र सोडले. दरम्यान, दीदी म्हणतात खेळ संपला, पण सत्य हे आहे की विकास सुरू होणार आहे. दीदींचे सरकार राष्ट्रीय शिक्षण योजनाची अमलबजावणी करण्यास नकार देत आहे. त्यांना बंगालमधील तरुणांच्या भविष्याची चिंता नाही. दीदींना बंगालमधील तरुणांच्या भविष्यासोबत खेळू देणार नाही, असेही मोदींनी ठणकावले.