महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांच्याही नावांचा समावेश

राज्यसभेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. असे असताना आता काँग्रेसनंतर महायुतीकडूनही राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांच्यासह इतर नावांचा समावेश आहे.

    नवी दिल्ली : राज्यसभेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. असे असताना आता काँग्रेसनंतर महायुतीकडूनही राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांच्यासह इतर नावांचा समावेश आहे.

    अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-शिवसेना या महायुतीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणत्या नावाची घोषणा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.