दुर्गा विसर्जनाच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना; ७ जणांचा मृत्यू

    देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला, मात्र शेवटच्या दिवशी या उत्सवाला एका दुर्घटनेमुळे गालबोट लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) बुधवारी रात्री दुर्गा विसर्जनादरम्यान जलपायगुडी (Jalpaiguri) येथील माल नदीत अचानक पूर आला. या पुरात अनेक जण अडकले असून यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

    बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमध्ये जवळपास ९ दिवस दुर्गा मातेची पूजा केल्यानंतर जलपाईगुडीमध्ये विजयादशमी उत्सव साजरा केला जात होता. दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी माल नदीवर नेल्या जात होत्या. विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी असलेले लोक खूप आनंदीत होते. महिला एकमेकांना सिंदूर लावून दुर्गादेवीला निरोपाचे गीत गात होत्या. सायंकाळी विधिवत विसर्जनासाठी दुर्गा मातेची मूर्ती नदीत नेण्याचे काम सुरू झाले. यावेळी अनेक महिला आणि पुरुषांनी नदीच्या मध्यभागी उभे राहून देवी दुर्गाला निरोप दिला. विसर्जनाच्या वेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेले. अपघातानंतर लगेचच जिल्हा प्रशासनाने विसर्जनाचा कार्यक्रम थांबवून लोकांच्या बचावकार्यास सुरुवात केली.

    एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्य करत असल्याची माहिती मिळत आहे. जलपाईगुडीचे एसपी देवर्षी दत्ता यांनी या घटनेला दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले की, ‘अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत ७ मृतदेह नदीमधून बाहेर काढण्यात आले आहेत, तर १० जखमींनाही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच याच सोबत ३०- ४० लोक अद्याप बेपत्ता आहेत, तेव्हा प्रशासनाकडून अद्यापही बचावकार्य सुरु आहे’.
    पश्चिम बंगालमधील दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख :

    दुर्घटनेचा व्हिडीओ