
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानसह महाराष्ट्रात पीएफआय या संघटनेशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. दिल्लीतील हौज काझी पोलिस स्टेशनच्या बल्लीमारानमध्ये तर दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले.
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानसह महाराष्ट्रात पीएफआय या संघटनेशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. दिल्लीतील हौज काझी पोलिस स्टेशनच्या बल्लीमारानमध्ये तर दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. याशिवाय राजस्थानमधील टोंकसह अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू केली.
एनआयएचे पथक जुन्या दिल्लीतील बल्लीमारान येथील मुमताज बिल्डिंगमध्ये शोध घेत आहे. एनआयएसोबत स्थानिक पोलिसही तिथे आहेत. या इमारतीत धार्मिक साहित्य छापण्याचे काम सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातही अनेक शहरे लक्ष्य
उत्तर प्रदेशातील लखनौ, बाराबंकी, बहराइच, सीतापूर, हरदोई येथेही छापे टाकण्यात आले आहेत. लखनौमधील मदेगंज येथील बडी पकरिया भागातील तीन घरांवर छापे टाकण्यात आले. एनआयएच्या टीमसोबत सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांची टीमही हजर होती.
मुंबईत अब्दुल वाहिदच्या घरी झाडाझडती
मुंबईतील विक्रोळी परिसरात अब्दुल वाहिद शेख यांच्या घरातही एनआयएने झाडाझडती घेतली. वाहिद शेख याला ट्रेन ब्लास्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, त्याची सर्व प्रकरणातून निर्दोष मुक्तताही झाली होती. त्यानंतर बुधवारी एनआयएने एकाचवेळी छापेमारी करून पीएफआयला मोठा हादरा दिला आहे.