तेजस्वींना CM करा आम्ही तुम्हाला PM बनवतो; राजदची नितीशकुमार यांना ऑफर

राजदने जेडीयूला एक ऑफर देऊ केली आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवावे आणि २०२४ मध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्यामध्ये राजद त्यांना समर्थन देईल

पाटणा.  अरुणाचल प्रदेशातील जेडीयूच्या सातपैकी सहा आमदारांना फोडल्यानंतर भाजपा आणि जेडीयू मधला तणाव कायम आहे. या नाजूक परिस्थितीचा फायदा घेतच राष्ट्रीय जनता दलाने एक डाव खेळला आहे. राजदने जेडीयूला एक ऑफर देऊ केली आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवावे आणि २०२४ मध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्यामध्ये राजद त्यांना समर्थन देईल अशी ऑफर राष्ट्रीय जनता दलाचे दिग्गज नेता आणि बिहार विधानसभेचे माजी सभापती उदय नारायण चौधरी यांनी  दिली आहे. जर नितीश कुमार एनडीएपासून फारकत घेत असतील आणि तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवत असतील तर राजद २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी समर्थन करुन मदत करेल, असे ते म्हणाले.

आता दिल्लीकडे कूच करण्याची वेळ
उदय नारायण चौधरी यांनी पुढे म्हटलंय की, नितीश कुमार यांच्यासाठी आता दिल्लीकडे कूच करण्याची वेळ आली आहे. आता त्यांना केंद्राच्या राजकारणात पाऊल ठेवलं पाहिजे. केंद्रात सातत्याने सक्षम विरोधी नेतृत्वाची पोकळी असून नितीश ती पोकळी भरुन काढण्यात सक्षम आहेत. तसेच 2024 च्या लोकसभेसाठी ते पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील बनू शकतात असे देखील उदयनारायण चौधरी म्हणाले.

युती मजबूत असल्याचा पुनरुच्चार
बिहारमध्ये भाजपा-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीएच्या सरकारला फक्त दोनच महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अनेकदा या दोन्हीही पक्षात वादाचे मुद्दे समोर आले आहेत. असं असलं तरीही दोन्हीही पक्ष सातत्याने युती मजबूत असल्याचाच पुनरुच्चार करत आहेत. विशेष म्हणजे याआधी नितीश कुमार यांनी स्वतः मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती, मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचं वक्तव्य केले होते. अशा पार्श्वभूमीवर राजदने दिलेली ही ऑफर महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

आता नितीशांनीच काय तो निर्णय घ्यावा
दरम्यानमाजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी केलेले विधान त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले.  भाजपा आणि जेडीयुमध्ये कधीच युती नव्हती तर ती एक तडजोड होती असे ते म्हणाले.  भाजपाला नितीशकुमार यांनी बिहारमध्ये हात पाय पसरविण्याची संधी दिली. आता काय करायचे, नाही करायचे ते नितीशकुमार यांनीच ठरवावे असे तेजस्वी यादव म्हणाले.  जनादेशाचा अपमान करून नितीश यांनीच महाआघाडीतून पळ काढला होता अशी आगपाखड करतानाच आत ते भाजपासमोर नतमस्तक झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. जो व्यक्ती सीएए, एनआरसी, कृषी कायदे, तिहेरी तलाकला पाठिंबा देतो तोच व्यक्ती लव्ह जिहादच्या मुद्यावर वेगळे मत प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे असा टोमणाही त्यांनी हाणला.