मी माझा जीव देईन, पण बंगालमध्ये CAA लागू होऊ देणार नाही :  ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये फुटीरतावादाला चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला आणि त्या राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच जेव्हाही निवडणूक येते, तेव्हा भाजप सीएए आणि एनआरसी लागू करण्याविषयी भाष्य केले जाते.

    नवी दिल्ली – जीव देईल पण कोणत्याही किंमतीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) बंगालमध्ये लागू होऊ देणार नाही, असे म्हणत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुंकार भरला आहे. नादिया जिल्ह्यातील रानाघाट येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता यांनी केंद्रावर टीका केली. बंगालमध्ये २०१९ लोकसभा आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने खोटे बोलून सीएएच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली आहे,असेही त्या म्हणाल्या.

    पश्चिम बंगालमध्ये फुटीरतावादाला चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला आणि त्या राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच जेव्हाही निवडणूक येते, तेव्हा भाजप सीएए आणि एनआरसी लागू करण्याविषयी भाष्य केले जाते. अशा परिस्थितीत, पुढील महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांना जवळपास दीड वर्ष शिल्लक असताना, सीएएच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे, असेही ममता म्हणाल्या.

    कोण नागरिक आणि कोण नाही हे भाजप ठरवेल का? असा सवाल त्यांनी केला. मतुआ हे देशाचे नागरिक आहेत.’ उत्तर २४ परगणा आणि नादिया जिल्ह्यांमध्ये राजकीयदृष्ट्या शक्तिशाली मतुआ समुदायाचे बरेच लोक राहतात. सध्या बंगालमध्ये सीएएवरून राजकारण तापले आहे. तत्पूर्वी, केंद्रीय गृह राज्यमंत्री निशिथ प्रमाणिक, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घोष आणि इतर नेत्यांनी देशभरात हळूहळू CAA लागू करण्यात येईल यावर भर दिला आहे.