मणिपूर भूस्खलन : मृतांची संख्या पोहोचली ३७ वर ; बचाव कार्यात पावसाचा अडथळा

शनिवारी रात्रीपासून तुपुल परिसरात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने शोध मोहिमेत अडचणी येत आहेत. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये 24 भारतीय लष्कराचे जवान, 11 गोरखा बटालियन टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि 13 नागरिकांचा समावेश आहे.

    नवी दिल्ली – मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनानंतर रविवारी आणखी तीन मृतदेह सापडले. यानंतर मृतांचा आकडा 37 वर पोहोचला असून 25 जणांचा शोध सुरू आहे. मात्र, शनिवारी रात्रीपासून तुपुल परिसरात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने शोध मोहिमेत अडचणी येत आहेत. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये 24 भारतीय लष्कराचे जवान, 11 गोरखा बटालियन टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि 13 नागरिकांचा समावेश आहे.

    बुधवारी रात्री झालेल्या पावसानंतर तुपूल रेल्वे स्थानकाला लागून असलेली टेकडी तुटून बांधकामाधीन स्टेशन यार्डवर पडली होती. भूस्खलनाच्या ढिगार्‍यांनी इजेई नदीचा प्रवाह रोखला आणि तलाव तयार झाला. इजेई नदी तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यातून वाहते.
    जिल्हा प्रशासनाने आजूबाजूच्या गावकऱ्यांना सावधगिरी बाळगून लवकरात लवकर जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला आहे.सध्या पाणी वाहून जाण्यासाठी ढिगारा साफ करण्याचे काम सुरू आहे. आसाममधील 7 लोकांचा भूस्खलनात मृत्यू झाला आहे. 5 वर उपचार सुरू आहेत. 13 अजूनही बेपत्ता आहेत. आसामचे मंत्री पियुष हजारिका यांनी ही माहिती दिली. ते सध्या नोनी येथील घटनास्थळी हजर आहेत.