
सौदी अरब आणि यूएई या दोन्ही देशांनी पाकिस्तानं भारताशी संबंध सुधारावेत, असा सल्ला दिला आहे. यापूर्वी यूएईनं इम्रान खान आणि जनरल बाजवा यांच्या कार्यकाळात भारताशी बंद दरवाजाआड गुप्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला होता.
नवी दिल्ली : आर्थिक मदत मिळावी म्हणून जगभरात भीकेची थाळी घेऊन फिरणाऱ्या जवळचे मित्र असणाऱ्या सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीनं मोठा झटका दिलाय. या दोन्ही देशांनी पाकिस्तानी सरकारला (Pakistan Government) स्पष्टपणे सांगितलं आहे की, आता काश्मीर विसरुन जा. भारताशी मैत्री करुन चांगले संबंध प्रस्थापित करा, असा सल्लाही पाकिस्तानला देण्यात आलाय. काश्मीरचा वाद संपुष्टात आणून त्यावर सातत्यानं विधाने करु नका, असा सल्लाही देण्यात आलाय. इतकंच नाही तर काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर (Article 370) जी बोंबाबोंब पाकिस्तानमध्ये करण्यात आली, ती आता बंद करुन शांत राहा, असं शहबाज सरकारला (Shehbaz Sharif) बजावण्यात आलेलं आहे. यूएईनं तर पाकिस्तानच्या संकटांचा विचारही न करता काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी पावलं टाकण्यासही सुरुवात केलेली आहे.
मुस्लिम देशाची संघटना OIC ही शांत
इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीमध्येही पाकिस्तान नेहमीच काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन गोंधळ घालीत असे. या संघटनेवर सौदी अरब या प्रभावशाली देशाचं वर्चस्व आहे. ही संघटना सौदी अरबच्या इशाऱ्यावर चालते. आता याच देशानं पाकिस्तानला इशारा दिला आहे की यापुढे ही संघटनाही काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला साथ देणार नाही. पाकिस्तान आत्तापर्यंत सातत्यानं या मुद्द्याचं भांडवल करुन जगात प्रत्येक व्यासपीठावर हा प्रश्न उपस्थित करीत होती. आता मात्र दोन प्रबळ मुस्लीम राष्ट्रांनीच पाकिस्तानला एकतर अर्थव्यवस्था वाचवा किंवा काश्मीर मुद्दा सोडा असे दोन पर्याय दिलेले दिसतायेत.
पाकिस्तानला सोडून सौदीची भारताशी मैत्री का?
सौदी अरब आणि यूएई या दोन्ही देशांनी पाकिस्तानं भारताशी संबंध सुधारावेत, असा सल्ला दिला आहे. यापूर्वी यूएईनं इम्रान खान आणि जनरल बाजवा यांच्या कार्यकाळात भारताशी बंद दरवाजाआड गुप्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काश्मीर मुद्द्यावर जनरल बाजवा भारताशी तह करण्याच्या तयारीतही होते, मात्र इम्रान खान अचानक या चर्चेतून माघारी फिरल्याचं सांगण्यात येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यानिमित्तानं पाकिस्तान दौराही होणार होता, मात्र इम्रान खान यांनी माघार घेतल्यानं तो रद्द झाला, असं बाजवा यांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्याची माहिती आहे.
सौदी अरब आमि यूएईचे भारताशी आर्थिक संबंध दृढ झालेले आहेत. या दोन्ही देशांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करुन पैसे कमवावेत. अशी भारताची इच्छा आहे. इंधना व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर पर्याय या दोन्ही देशांनाही हवे आहेत. काश्मीरमध्ये झालेल्या एका बैठकीत दोन्ही देशांचे उद्योगपतीही येऊन गेलेले आहेत. यामुळं काश्मीरला विवादास्पद ठरवणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटकाही बसला होता.