जम्मूमध्ये पेट्रोल पंपावर जोरदार स्फोट, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

मंगळवारी जम्मूच्या नरवाल भागातील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये स्फोट झाला, त्यामुळे परिसरात घबराट पसरली. स्फोटाच्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

    जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & kashmir ) मंगळवारी मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. हा स्फोट जम्मूच्या नरवाल भागातील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये झाला. स्फोटाचा आवाज  इतका जोरदार होता की परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. दुपारी 12.15 च्या सुमारास हा स्फोट झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की इंडियन ऑइलच्या टँकरमध्ये गळती झाली होती, त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याची शक्यता आहे. मात्र, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.”
    प्राथमिक तपासात या स्फोटामागे अतिरेक्यांचा हात असल्याचा कोणताही संकेत मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाजवळील एक इमारत रिकामी केली असून पुढील तपास करत आहेत. या ठिकाणी पेट्रोल पंप असून त्याच इमारतीत बँकेचे कार्यालयही बांधले आहे. स्फोट झाला तेव्हा पेट्रोल पंप आणि बँक कर्मचारीही उपस्थित होते. बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, दोन स्फोट झाले आणि सर्वजण घाबरले आणि कसेतरी इमारतीच्या बाहेर आले. त्याचवेळी स्फोटामुळे पेट्रोल पंपाच्या कार्यालयाच्या इमारतीचे तर नुकसान झालेच, पण त्याठिकाणी जमिनीलाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.
    राजौरीमध्ये सापडला मोर्टार शेल: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ 120 मिमीचा मोर्टार शेल सापडला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काही ग्रामस्थांनी सोमवारी रात्री कलाल सीमा परिसरात नदीच्या काठावर पडलेला शेल पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळताच लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले आणि नियंत्रित स्फोटाद्वारे शेल नष्ट करण्यात आले.