राजधानी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक; पाच राज्यातील निकालानंतर होणार विचारमंथन

पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर आता इंडिया आघाडीची बैठक मंगळवारी दिल्लीत होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये काँग्रेसला हार पत्करावी लागल्याने याचे पडसाद बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर आता इंडिया आघाडीची बैठक मंगळवारी दिल्लीत होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये काँग्रेसला हार पत्करावी लागल्याने याचे पडसाद बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेसने स्थानिक आणि प्रादेशिक पक्षांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली नाराजी व्यक्त केली आहे.

    देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल काल रविवारी समोर आला आहे. यापैकी तीन राज्यांत भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर, काँग्रेसला केवळ एका राज्यावर समाधान मानावे लागले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला यश मिळवण्याची पूर्ण संधी होती. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने चांगल्या मताधिक्क्याने भाजपावर विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेसचा हाच करिष्मा पुन्हा मध्य प्रदेशात होण्याची शक्यता होती. परंतु, काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे.

    मध्य प्रदेशात काँग्रेसने समाजवादी पार्टीसोबत समझोता करायला पाहिजे होता, असे राजकीय निरिक्षणकांचे म्हणणे आहे.

    ‘इंडिया’ आघाडी आजही मजबूत

    पाच राज्यांच्या कालच्या निकालानंतरही इंडिया आघाडी मजबुतीने उभी आहे. ६ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक खर्गेच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत होत आहे. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेही दिल्लीत सहभागी होणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.