‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ लवकच आंध्र प्रदेशात धडकणार, 3 राज्यांना सतर्कतेचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याशी मिचॉन्ग चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

  बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ येण्याची शक्यता वाढली आहे. नुकत्याच मिळालेल्या अपडेट नुसार, हे  ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ 5 डिसेंबरपर्यंत नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी, ताशी 80-90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, दक्षिण ओडिशाच्या बहुतांश भागात आणि राज्याच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  भारतीय हवामानशास्त्र विभागाने आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीसाठी पुढील १२ तासांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा करून चक्रीवादळ मिचॉन्गचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांना मदत आणि बचाव कार्यात सामील होण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

  भुवनेश्वरच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की चक्रीवादळाच्या प्रभावाखाली ओडिशात पाऊस पुन्हा सुरू होऊ शकतो आणि पुढील दोन दिवसांत त्याची तीव्रता वाढेल. ओडिशातील मलकानगिरी, कोरापुट, रायगडा, गजपती आणि गंजम येथे 4 आणि 5 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, IMD ने यलो अलर्ट जारी केला आहे.

  राज्य सरकारने सर्व किनारी आणि दक्षिण जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अलर्टवर ठेवले असून कृषी विभागांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. ईस्ट कोस्ट रेल्वे (ECOR) ने मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता लक्षात घेऊन 54 गाड्यांचे संचालन रद्द केले आहे. मच्छिमारांना पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

  समुद्राची पातळी ५ फुटांनी वाढली

  चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील महाबलीपुरम बीचवर समुद्राची पातळी सुमारे 5 फुटांनी वाढली आहे. मच्छिमार आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. चेन्नई हवामान खात्याने 4 आणि 5 डिसेंबर रोजी चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर आणि कांचीपुरम आणि त्यानंतर पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या ममल्लापुरम आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत असून परिसरातील लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.