
जपानी मियाझाकी आंब्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 2.5 लाख ते 2.70 लाख रुपये प्रति किलो आहे. यावेळी मियाजाकी आंब्याचे उत्पादनही चांगले आले, हे पाहून शेतकरी अरिंदमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
जामतारा : झारखंडचा जामतारा (Jamtara) जिल्हा केवळ बटाटा-कांद्याच्या किमतीत विकल्या जाणाऱ्या काजूसाठीच नव्हे, तर जगातील सर्वात महागड्या मियाझाकी आंब्यासाठीही (Jharkhand Miyazaki Mango) ओळखला जातो. येथी नाला विधानसभेचे अरिंदम चक्रवर्ती यांच्या बागेत अनेक विदेशी प्रजातींचे आंबे आहेत. त्यामध्ये जगातील सर्वात महागडा आंबा म्हणजे जपानचा मियाझाकी, थायलंडचा व्हेरीमँगो आणि चकापाटा, अमेरिकन जातीचा अमियाका रेड किंग, इंडोनेशियाचा हारुन मनीष यासह अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. यातील जपानी मियाझाकी आंब्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 2.5 लाख ते 2.70 लाख रुपये प्रति किलो आहे.
परदेशी आंब्याची लागवड करणारा झारखंडचा पहिला शेतकरी
अरिंदम सांगतात की झारखंडमधला तो पहिला शेतकरी आहे, ज्याने वेगवेगळ्या प्रजातींचे आंबे एकत्र पिकवायला सुरुवात केली. अरिंदमच्या यशाची चर्चा जामतारा बाहेर इतर जिल्ह्यातही होऊ लागली आहे. विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर या शेतकऱ्याच्या शेतीचा उल्लेख करणारी पोस्ट अपलोड केली आहे. अरिंदमने सांगितले की, 5 वर्षांपूर्वी वेगवेगळ्या देशांतून पार्सलद्वारे आंब्याची रोपे लावण्यास सुरुवात केली होती. एक रोप लावण्यासाठी 5000 ते 7000 रुपये खर्च आला. अरिंदम सांगतो की, जेव्हा त्याने हा नवा प्रयोग केला तेव्हा लोक त्याला टोमणे मारायचे. जामताऱ्यात हा प्रयोग कधीच यशस्वी होऊ शकत नाही, असे लोक हसून म्हणायचे. मात्र अरिंदम म्हणतो, सुरुवातीला ज्यांनी टर उडवली तेच आज त्याचं कौतुक करत आहेत विशेष म्हणजे, गेल्या वर्षी अरिंदम आपल्या बागेत सफरचंदाची लागवड करून प्रसिद्धीझोतात आला होता.
हा आंबा इतका महाग का?
मियाझाकी आंबा हा जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो. हो आंबे हे भारतात दुर्मिळ आहेत. मोजक्याच ठिकाणी हे आंब्यांची झाडे लावल्याची माहिती आहे. त्यामुळेच हे आंबे प्रचंड महाग आहेत. कारण यांचे उत्पादनच फार कमी होते. मात्र यांची चव अत्यंत गोड असते. हे आंबे इतर आंब्यापेक्षा वेगळे दिसतात. परदेशात लोक हे आंबे भेटवस्तू म्हणून देतात.