मोदींचा पहिल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कारानं गौरव होणार! ‘या’ तारखेला मुंबईत पुरस्काराचं वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिल्या वाहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. दिवगंत लता मंगेशकर यांची बहीण उषा मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिल्या वाहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. दिवगंत लता मंगेशकर यांची बहीण उषा मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. 24 एप्रिल रोजी या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत येणार आहेत.

    दरम्यान मुंबईतल्या षण्मुखानंदमध्ये पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. उषा मंगेशकरांच्या हस्तेच या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्यानं राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित केला जाणार आहे. मोदींनी देशाप्रती केलेलं काम पाहून त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मोदींसोबत क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनाही यावेळी गौरवण्यात येणार आहे.

    मोदींसोबत कुणाकुणाचा गौरव?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांनाही लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

    मोदी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा लता मंगेशकर यांनी व्यक्त केली होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना लता मंगेशकर यांनी एक वक्तव्य केलेलं. एक भाषणात लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. 15 वर्षांपूर्वी दीदीनाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटनही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तेव्हापासून लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी यांच्यात बहीण भावाचं नातं निर्माण झाल्याचीही आठवण हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळी सांगितली.