
भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी मिळावी, अनेकजण धडपड करत असतात. पण एक नाव असं होतं जे दोनदा यूपीएससीची (UPSC Exam) परीक्षा उत्तीर्ण झाले. इतकेच नाहीतर त्यांच्या यशाबद्दल त्यांना भारतातील सर्वात शिक्षित माणूस असे म्हटले जाते.
नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी मिळावी, अनेकजण धडपड करत असतात. पण एक नाव असं होतं जे दोनदा यूपीएससीची (UPSC Exam) परीक्षा उत्तीर्ण झाले. इतकेच नाहीतर त्यांच्या यशाबद्दल त्यांना भारतातील सर्वात शिक्षित माणूस असे म्हटले जाते. राजकारणी व्हायची त्यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. पण दुर्दैवी असं की अवघ्या 49 वर्षी त्यांचं निधन झाले.
श्रीकांत जिचकार असे या व्यक्तीचे नाव आहे. 14 सप्टेंबर 1954 रोजी जन्मलेले जिचकार हे भारतातील आतापर्यंतचे सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून ओळखले जातात. श्रीकांत जिचकार हे आयएएस अधिकारी होते, नंतर ते राजकारणात गेले. त्यांनी एक-दोन नव्हे तर 20 विद्यापीठांच्या पदव्या मिळवल्या आहेत ते फक्त 26 वर्षांचे असताना भारतातील सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले. श्रीकांत जिचकार यांचा जन्म काटोल, महाराष्ट्र येथे झाला.
उच्च पदव्यांचा अक्षरश: साठाच
श्रीकांत जिचकार यांनी वैद्यकशास्त्रातील पहिली पदवी (नागपूरमधून एमबीबीएस आणि एमडी) मिळवली आणि त्यानंतर कायद्याची पदवी, आंतरराष्ट्रीय कायद्यातील मास्टर ऑफ लॉ, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ जर्नालिझम, डॉक्टर ऑफ जर्नालिझम या पदव्या मिळवल्या. संस्कृतमधील साहित्य, सार्वजनिक प्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र, आणि मानसशास्त्र या विषयात दहा मास्टर्स ऑफ आर्ट्स पदवी घेतली.
1980 मध्ये पहिल्यांदा आमदार
श्रीकांत हे महाराष्ट्र विधानसभेचे (1980-85), महाराष्ट्र विधान परिषदेचे (1986-92) सदस्य होते आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री म्हणून काम केले. ते राज्यसभेवरही गेले आणि 1992-98 दरम्यान खासदार राहिले. 1992 मध्ये जिचकार यांनी नागपुरात सांदीपनी शाळेची स्थापना केली.