मोस्ट वॉन्टेड ड्रग सप्लायर कैलास राजपूत लंडनमध्ये ताब्यात, लवकरच भारतात आणणार

कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू करण्यासाठी सीबीआय परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधणार आहे.

    देशातील सर्वात मोठा आणि कुख्यात ड्रग सप्लायर कैलास राजपूत उर्फ ​​केआरचा शोध लागला आहे. केआर ब्रिटनमध्ये लपला असून त्याला लंडनमधून भारतात आणण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. कैलास राजपूत केवळ भारतातच नाही तर आखाती आणि युरोपीय देशांमध्येही अंमली पदार्थांचा व्यापार करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कैलाश राजपूत 2014 पासून फरार आहे आणि भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर तो दुबईमध्ये जाऊन लपला, त्यानंतर तो जर्मनीला गेला आणि आता लंडनमध्ये लपून होता.

    कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू करण्यासाठी सीबीआय परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि ब्रिटनमध्ये 1993 पासून प्रत्यार्पण करार आहे. त्याचा पासपोर्ट यूकेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला असून तो सध्या नजरकैदेत आहे.

    कैलास राजपूतने देशात विशेषत: मेफेड्रोनचा पुरवठा बेकायदेशीरपणे केला होता. फेब्रुवारी 2018 मध्ये,अंबोली पोलीस पथकाने दोन जणांना अटक केली आणि ₹ 2.73 कोटी किमतीचे 13.5 किलो ड्रग्ज जप्त केले होते.