आपचं ठरलं!  मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A.  बैठकीत होणार सहभागी ; अरविंद केजरीवाल यांनी केली पुष्टी

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या आधी स्थापन झालेल्या I.N.D.I.A. विरोधी आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. आम आदमी पक्षाने यात सहभागाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होणाऱ्या I.N.D.I.A (इंडिया) च्या बैठकीत आम आदमी पार्टी (AAP) सहभागी होणार आहे. याला आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुजोरा दिला आहे.

    ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी आगामी I.N.D.I.A (इंडिया) च्या बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबईला आम्ही जाणार आहे आणि तिथे जी काही रणनीती बनवली जाईल त्याची माहिती त्यांनतर तुम्हाला देण्यात येईल.

    I.N.D.I.A (इंडिया)ची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसमध्ये अनेक बाबींवर मतभेद पाहिल्यानंतर ते या बैठकीला उपस्थित राहतील की नाही, याबाबत साशंकता होती. आता सीएम केजरीवाल या बैठकीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंडिया) च्या मुंबईत होणाऱ्या तिसर्‍या बैठकीला २६ हून अधिक राजकीय पक्षांचे सुमारे ८० नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सध्या 26 पक्ष युती गटाचा भाग आहेत आणि दोन दिवसांच्या बैठकीत आणखी काही पक्ष युतीमध्ये सामील होणार आहेत. या बैठकीत युतीच्या लोगोचे अनावरण होण्याची शक्यता आहे.