लोकसभा निवडणुकीत मोदीच असणार भाजपचा चेहरा; विरोधकांच्या चेहऱ्याबाबत मात्र संभ्रम कायम

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात मोठा राजकीय चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) असणार असल्याचे पाच राज्यांच्या निकालांवरून सिद्ध झाले आहे. त्यांच्यासमोर सर्वच नेते बटू ठरले आहे.

    नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) देशातील सर्वात मोठा राजकीय चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) असणार असल्याचे पाच राज्यांच्या निकालांवरून सिद्ध झाले आहे. त्यांच्यासमोर सर्वच नेते बटू ठरले आहे. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा दुसरा मोठा चेहरा ठरले आहे. तर इतर नेते केवळ कोरम पूर्ण करण्यासाठी असतील, असे बोलले जात आहे.

    विरोधकांबाबत बोलायचे झाल्यास काँग्रेसच्या बाजूने मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक चेहरे होऊ शकतात. पण त्यापैकी एक-दोन हे संयुक्त विरोधी चेहेरे असतील. या निवडणुकीच्या निकालांनी याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. काँग्रेसला संयुक्त विरोधी पक्षाचा चेहरा आणि नेतृत्व देऊन आता सर्व विरोधी पक्ष पूर्वीपेक्षा जास्त विरोध व्यक्त करू शकतील, असे मानले जात आहे. या निवडणुकांतील रणनीतीबाबत बोलायचे झाल्यास मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये वातावरण काँग्रेसच्या बाजूने असतानाही ते त्यावर स्वार होऊ शकले नाही. यामागे अंतर्गत गटबाजीचे कारण आहे.

    गटबाजीमुळे त्यांची रणनीती पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचे मानले जाते. मध्य प्रदेशात अनेक प्रसंगी कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यातील मतभेद स्पष्टपणे दिसत होते. आपापल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यावरूनही दोन्ही गटांमध्ये चुरस पाहायला मिळाली. कमलनाथ मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे काँग्रेस पूर्वीपासूनच म्हणत होती. पण दिग्विजय सिंग मैदानावर अधिक प्रभावी राहिले. त्यामुळे अप्रत्यक्ष संघर्ष कायम राहिला.

    अंतर्गत कलह काँग्रेसला नडला

    छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव एकत्र नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. इतकेच नाही तर, भूपेश बघेल यांना सुरुवातीपासूनच आपण जिंकणार असल्याचा विश्वास होता. हे काँग्रेससाठी नकारात्मक असल्याचेही म्हटले जात आहे. राजस्थानमध्येही काँग्रेसमधील नेत्यांचा हा संघर्ष सुरूच होता. जिथे अशोक गहलोत शेवटपर्यंत सचिन पायलटला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत राहिले. त्यामुळे काँग्रेसमध्येही फूट पडली.