नासाच्या ‘डार्ट’ची धोकादायक ‘डायमॉर्फस’ला धडक, लघुग्रहाची कक्षा बदलणार

डिडीमॉस हा छोटा अशनी डायमॉर्फस या मोठ्या अशनीभोवती चंद्रासारखा प्रदक्षिणा घालतो आहे. डार्ट यानाच्या डायमॉर्फसशी होणाऱ्या या टकरीचा उद्देश अशनीच्या कक्षेत होणारा बदल अभ्यासणे हा आहे. या आघाताचं चित्रण डार्ट यानावरच्या ड्रॅको या कॅमेऱ्याद्वारे केले जाईल.

    नवी दिल्ली – अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेचे (नासा) डार्ट नामक अंतराळ यान मंगळवारी पहाटे डायमॉर्फस नामक एका लघुग्रहाचा वेध घेणार आहे. हा लघुग्रह (अशनी) भविष्यात पृथ्वीसाठी धोकादायक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे वैज्ञानिक या धडकेद्वारे या लघुग्रहाचा मार्ग (कक्षा) बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत.

    भारतीय प्रमाणवेळेनुसार, मंगळवारी पहाटे ४ वाजून ४४ मिनिटांनी सुदूर अंतराळात हा वैज्ञानिक थरार रंगणार आहे. या अद्भूत खगोलीय घटनेचे लाइव्ह प्रसारण खगोलप्रेमींना मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेच्या मदतीने पाहता येणार आहे.

    डिडीमॉस हा छोटा अशनी डायमॉर्फस या मोठ्या अशनीभोवती चंद्रासारखा प्रदक्षिणा घालतो आहे. डार्ट यानाच्या डायमॉर्फसशी होणाऱ्या या टकरीचा उद्देश अशनीच्या कक्षेत होणारा बदल अभ्यासणे हा आहे. या आघाताचं चित्रण डार्ट यानावरच्या ड्रॅको या कॅमेऱ्याद्वारे केले जाईल.

    भविष्यात जर कधी एखादा अशनी पृथ्वीवर आदळणार असला, तर आदळण्याआधीच त्याचा मार्गबदल करण्यासाठी हा अभ्यास उपयोगी पडणार असून त्यादृष्टीने ही मोहीम आखण्यात आली आहे. या घटनेचे थेट प्रक्षेपण पहाटे तीन वाजता सुरू होईल. हौशी विद्यार्थी व अभ्यासकांना ते एका विशिष्ट लिंकद्वारे आपापल्या मोबाईलद्वारे पाहता येईल, असे मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांचे म्हणणे आहे.