नवज्योतसिंग सिद्धू उद्या तुरुंगातून सुटणार! चांगल्या वागणुकीमुळे 45 दिवस आधी बाहेर येणार, 10 महिन्यांपासून आहेत पटियाला कारागृहात

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू रोड रेज प्रकरणी पटियाला जेलमध्ये बंद आहेत. 1 एप्रिलला त्यांची तुरुंगातुन सुटका होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पटियाला तुरुंगात एक वर्षाची शिक्षा भोगत असलेले काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू  (Navjot Singh Sidhu) यांची उद्या 1 एप्रिल रोजी तुरुंगातून सुटका होणार आहे. कॅबिनेट मंत्री अमन अरोरा यांनीही त्यांच्या सुटकेला दुजोरा दिला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

1988 सालच्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. गेल्या 10 महिन्यांपासून ते तुरुंगात आहे. आता चांगल्या वागणुकीमुळे 45 दिवस आधी बाहेर येणार असल्याने काँग्रेस नेत्यांना पक्षात नवी ऊर्जा आणि संवादाची आशा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नजरा नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सुटकेकडे लागल्या आहेत. दरम्यान, सिद्धूच्या सुटकेमुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारत येत नाही.