navneet rana

नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीतील (Delhi) कॅनॉट प्लेस भागात गेले. महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे,असेही नवनीत राणा यांनी सांगितले.

    मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट आहेत. महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण केल्याचं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीतील(Delhi)कॅनॉट प्लेस भागात गेले. राणा दाम्पत्यानी दिल्लीत हनुमान चालिसा पठण केले. यावेळी दिल्लीत राणा समर्थकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.

    हनुमान चालिसा पठण तसेच महाआरती करण्यासाठी राणा दाम्पत्य आज सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान दिल्ली येथील त्यांच्या घरापासून पायी हनुमान मंदिरात पोहचले. उद्धव ठाकरे यांची १४ मे रोजी मुंबईत सभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी हनुमान चालीसा पाठ करतील, असे राणा म्हणाले होते.

    यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की,मी घाबरणार नाही, थकणार नाही. महिलांना घाबरवून जेलमध्ये डांबणं हे मान्य नाही तसेच इतकी कमजोर देशातील स्त्री मुळीच नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे.

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. राणा दाम्पत्याला या प्रकरणात अटकही झाली होती.