राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारावर पुन्हा अपात्रतेची तलवार; दोषसिद्धीच्या स्थगितीवर होणार पुनर्विचार

लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammed Faisal) यांना सुप्रीम कोर्टाकडून झटका बसला आहे. फैजल यांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    नवी दिल्ली : लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammed Faisal) यांना सुप्रीम कोर्टाकडून झटका बसला आहे. फैजल यांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळ हायकोर्टाने जानेवारीमध्ये या प्रकरणी शिक्षेला स्थगिती दिली होती. यानंतर निवडणूक आयोगाने येत्या दोन आठवड्यांत होणाऱ्या पोटनिवडणुकांचे (By poll Election) वेळापत्रक जाहीर करताच फैजल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

    सुनावणीवेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला. आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला दोषी ठरविण्याच्या स्थगितीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. न्या. बी. व्ही. नगररत्न आणि उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने केरळ उच्च न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या आदेशाला अयोग्य ठरवले आहे.

    हायकोर्टच देणार निकाल

    लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना दणका देत सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार पुन्हा एकदा टांगली आहे. सध्या केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत फैजल खासदार राहतील. त्यानंतर 6 आठवड्यांत उच्च न्यायालयाला पुनर्विचार करून निर्णय द्यावा लागेल. म्हणजे फैजलला अपात्र ठरवायचे की नाही हे उच्च न्यायालयाचा निर्णयच ठरवेल.