
एअर इंडियातून (Air India) महिला फ्लाइट क्रूसाठी असलेला साडीचा युनिफॉर्म आता निरोप घेणार आहे. महिला फ्लाइट क्रूसाठी नवीन युनिफॉर्म (Uniform) नोव्हेंबरपर्यंत येऊ शकतो.
नवी दिल्ली : एअर इंडियातून (Air India) महिला फ्लाइट क्रूसाठी असलेला साडीचा युनिफॉर्म आता निरोप घेणार आहे. महिला फ्लाइट क्रूसाठी नवीन युनिफॉर्म (Uniform) नोव्हेंबरपर्यंत येऊ शकतो. महिलांसाठी खास डिझाइन केलेला चुडीदार युनिफॉर्म निवडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पुरुषांचा युनिफॉर्मही बदलण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी युनिफॉर्ममध्ये सूटचा समावेश केला जाईल.
एअर इंडिया तब्बल सहा दशकांनंतर युनिफॉर्ममध्ये बदल करणार आहे. नोव्हेंबरपर्यंत महिला कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममधून साड्या हटवल्या जातील हे जवळपास निश्चित झाले आहे. 1962 पर्यंत, महिला कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्ये स्कर्ट, जाकीट आणि टोपीचा समावेश होता. पण त्यानंतर दिवंगत जेआरडी टाटा यांच्या सूचनेनुसार साड्यांचा गणवेश म्हणून समावेश करण्यात आला. त्यानंतर बिन्नी मिल्समधून पहिली साडी घेतली. क्रूच्या नव्या लूकची जबाबदारी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्याकडे देण्यात आली आहे. पण नवीन लूकमध्ये कर्मचाऱ्यांना ट्रॅडिशनल लूकचा पर्यायही दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
महिलांसाठी चुडीदार आणि पुरुष क्रू मेंबर्ससाठी सूट दिले जातील. नवीन युनिफॉर्मचा रंग गडद लाल, जांभळा किंवा सोनेरी असू शकतो, असे सांगण्यात आले आहे. युनिफॉर्ममधून साडी पूर्णपणे काढून टाकली जाईल. त्याचवेळी अन्य अधिकाऱ्यांच्या वतीने असेही सांगण्यात आले आहे की, सध्या साडी पूर्णपणे बंद करता येणार नाही. विमान कंपनीला युनिफॉर्म म्हणून साडीचा पर्यायही देण्यात आला होता. ही पारंपरिक साडीपेक्षा थोडी वेगळी होती. मात्र, व्यवस्थापनाने याकडे लक्ष दिले नाही. पण, यावर एअर इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.