केरळमध्ये नवा व्हायरसची एन्ट्री; विद्यार्थाला संसर्ग, काय आहेत लक्षणं, वाचा

कोरोनाचा प्रादुर्भावात केरळमध्ये एका नव्या व्हायरसनं धुमाकुळ घातला आहे. एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे

  गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Coronavirus) संपूर्ण जग चिंताग्रस्त झालंय. चीनसह अनेक देशात कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. सध्या भारतात कोरोनानं थोडी उंसत घेतली असली तरी संसर्ग होण्याच प्रमाण आहेच. अशा परिस्थितीत आता केरळमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.  केरळमध्ये मात्र एका नव्या व्हायरसन शिरकाव केला आहे. त्यामुळे केरळसह संपूर्ण देशाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, अद्याप धोका मात्र टळलेला नाही. कोरोनावर योग्य त्या उपाययोजना केल्यामुळे सध्या केरळसह देशभरात त्याचा प्रभाव कमी झालेला दिसत आहे. मात्र, नुकतच केरळमधील कक्कनाड (Kakkanad) येथील एका खासगी शाळेत काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याची बाब समोर आली. या विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्यांना एका नव्या व्हायरसची लागण झाल्याचं निर्दशनास आलं. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (DMO) दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या वैद्यकीय अहवालातून त्यांना नोरोव्हायरसची (Norovirus) पुष्टी झाल्याचं समोर आलं आहे.

  विद्यार्थांमध्ये कोणती लक्षणं

  खासगी शाळेतील या विद्यार्थांना उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणं दिसून आली. तपसणी नतंर ही लक्षण नोरोव्हायरसची  असल्याचं स्पष्ट झालं. खबरदारी म्हणून इयत्ता पहिली आणि दुसरीमधील काही विद्यार्थ्यांचे आणि काही पालकांचे नमुने राज्य सार्वजनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सोमवारी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (DMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन नमुन्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याचबरोबर तीन मुलांवर उपचार सुरू आहेत.

  उपाययोजना केल्या जात आहेत

  डीएमओ माहिती देताना म्हणाले की, नोरोव्हायरसची लागण झालेल्या मुलांची स्थिती चिंताजनक नाही. दरम्यान, उद्रेक झाल्यानंतर, शाळेनं इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधात्मक आणि जनजागृतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. ऑनलाईन जनजागृती वर्ग आयोजित केले जात आहेत.

  अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ज्या शाळेत संसर्ग पसरला आहे. त्या शाळेतील वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यात आली आहेत. तसेच, लक्षणं दिसणाऱ्यांना तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जनतेनं दक्ष राहावं आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ असावेत, असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे. योग्य उपचार आणि खबरदारी घेतल्यास हा आजार कमी वेळात बरा होऊ शकतो, असं डीएमओच्या निवेदनात म्हटलं आहे.

  नोरोव्हायरस कसा पसरतो?

  तज्ज्ञांच्या मते, नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य विषाणू आहे. ज्यामुळे उलट्या आणि अतिसार होतो. या व्हायरसची लागण झाल्यानंतर सामान्य लक्षणं म्हणजे, कमी दर्जाचा ताप किंवा थंडी वाजून येणं, डोकेदुखी आणि स्नायू दुखणं यांचा समावेश होतो. हा व्हायरस सामान्यतः निरोगी लोकांवर परिणाम करत नाही. परंतु, यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि सह-विकृती असलेल्या लोकांसाठी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.नोरोव्हायरस (Norovirus) दूषित पाणी आणि अन्नातून पसरू शकतो. संक्रमित लोकांशी थेट संपर्क देखील त्याची लागण होऊ शकते. हा व्हायरस लागण झालेल्या रूग्णाच्या विष्ठेतून आणि उलट्यांद्वारे देखील पसरू शकतो.

  उपचार काय?

  संक्रमित लोकांना डॉक्टरांच्या सूचनेनुसार घरी आराम करण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना भरपूर उकळलेले पाणी आणि ओरल रिहायड्रेशन सॉल्टचं (ओआरएस) सेवन करावं लागतं. गरज पडल्यास डॉक्टरांची सल्ला घेणं गरजेचं आहे. संक्रमित व्यक्तीनं बरं झाल्यानंतर काही दिवस आराम करावा.