
फोर्ब्सकडून(Forbes Most Powerful 100Women List) दरवर्षी जगातील १०० सर्वात प्रभावी महिलांची यादी जाहीर केली जाते.यावर्षी सलग तिसऱ्यांदा निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
फोर्ब्सकडून(Forbes Most Powerful 100 Women List) दरवर्षी जगातील १०० सर्वात प्रभावी महिलांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman In Forbes List) यांचा समावेश होत आहे. यावर्षी सलग तिसऱ्यांदा निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यांनी अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन यांना देखील मागे टाकलं असून थेट ३७ व्या स्थानी झेप घेतली आहे. जगभरातील १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये एकूम चार भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये निर्मला सीतारमण यांचा क्रमांक सर्वात वरचा असून त्याखालोखाल ५२, ७२ आणि ८८ अशा क्रमांकावर भारतीय महिला आहेत.
२०१९ आणि २०२० या दोन वर्षी फोर्ब्सनं जाहीर केलेल्या १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारमण यांचा समावेश झाला होता. यंदा पुन्हा एकदा त्यांची या यादीमध्ये वर्णी लागली असून त्या ३७व्या क्रमांकावर आहे. त्याउलट अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन या ३९व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी निर्मला सीतारमण या यादीमध्ये ४१व्या स्थानी होत्या.
निर्मला सीतारमण यांच्यासोबत एचसीएल टेक्नॉलॉजीच्या संचालिका रोशनी नाडर यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. १०० महिलांच्या यादीत रोशनी नाडर ५२ व्या क्रमांकावर आहेत. रोशनी नाडर या नामांकित आयटी कंपनीचं प्रमुखपद सांभाळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला उद्योजिका आहेत.
रोशनी नाडर यांच्यासोबत बायोकॉनच्या कार्यकारी संचालिका किरण मुझुमदार शॉ यांचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुझुमदार यादीत ७२व्या स्थानी आहेत. १९७८ साली मुझुमदार शॉ यांनी बायोकॉनची स्थापना केली होती.
दरम्यान, नुकत्याच देशातील सातव्या बिलियनर ठरलेल्या नायकाच्या सीईओ फाल्गुनी नायर यांचा देखील यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्या १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये ८८व्या स्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी नायकाच्या स्टॉक मार्केटमझ्ये झालेल्या धमाकेदार एंट्रीमुळे देखील फाल्गुनी नायर चर्चेत आल्या होत्या.