‘नितीशकुमारच इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार’; जेडीयू नेत्याचा दावा

एक देश-एक निवडणुकांवर स्थापन केलेली समिती एकत्रित निवडणुकांची (Politics) शक्यता पडताळून पाहत असतानाच दुसरीकडे, सर्वच राजकीय पक्षांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची, तयारी सुरू केली आहे.

    नवी दिल्ली : एक देश-एक निवडणुकांवर स्थापन केलेली समिती एकत्रित निवडणुकांची (Politics) शक्यता पडताळून पाहत असतानाच दुसरीकडे, सर्वच राजकीय पक्षांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपविरोधात देशातील 35 विरोधी पक्षांनी एकत्रित येत इंडिया आघाडी उभारली असून, तूर्तास तरी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. तथापि, जेडीयू नेते तसेच बिहार विधानसभेचे उपसभापती महेश्वर हाजरी (Maheshwar Hajari) यांनी या पदासाठी नितीशकुमार हेच योग्य उमेदवार असून, त्यांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

    मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत जेडीयूच्या सर्व सेल अध्यक्षांच्या बैठकीनंतर त्यांनी नितीश कुमार यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. इंडिया आघाडी जेव्हा जेव्हा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करेल, तेव्हा त्यात नितीशकुमार यांचेच नाव असेल. भारतात पंतप्रधानपदासाठी त्यांच्यापेक्षा योग्य कोणीही नाही. नितीश कुमार हे या देशातील सर्वात मोठे समाजवादी नेते आहेत.

    लवकरच होणार घोषणा

    नितीशकुमार यांनी संपूर्ण विरोधकांना एकत्र केले आहे. त्यामुळे आज नाही तर उद्या त्यांची उमेदवारी इंडिया आघाडीतर्फे जाहीर केली जाईल. यापूर्वी जेडीयू अध्यक्ष लालन सिंह यांनीही ही मागणी केली होती. ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते की, लोकांना नितीशकुमार यांना देशाचे नेतृत्व करताना पाहायचे आहे. यावेळी जेडीयू सरकारमधील प्रमुख मंत्री लेसी सिंह यांनीही नितीश कुमार यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. यामुळे आता नितीश कुमार यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू आहे.