“सावरकर गौरव यात्रा नव्हे… तर अदानी बचाव यात्रा”, गौरव यात्रेवरुन काय म्हणाले संजय राऊत?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर ती 'सावरकर गौरव यात्रा' नव्हे तर ती 'अदानी बचाव यात्रा', 'खुर्ची बचाव यात्रा' आहे, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले आहे.

नवी दिल्ली- सध्या राज्यासह देशात सावरकारांबाबत राहुल गांधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. “माफी मागायला माझे नाव सावरकर नाहीय…” असं राहुल गांधीनी (Rahul Gandhi) वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद होत आहे. यावरुन बरेच राजकारण रंगले आहे. काल नवी दिल्लीत विरोधीपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सावरकारांविषयी सांभाळून बोला, असा सल्ला दिल्यानंतर, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत सावरकरांविषयी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टिका केली. तर दिल्लीत शरद पवारांनी देखील राहुल गांधींचे कान टोचले आहेत. दरम्यान, यानंतर आज सकाळी नवी दिल्लीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना, शिंदे गट व भाजपा सावरकर गौरव यात्रेवर सडकून टिका केली.

‘सावरकर गौरव यात्रा’ नव्हे तर ‘अदानी बचाव यात्रा’

दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर ती ‘सावरकर गौरव यात्रा’ नव्हे तर ती ‘अदानी बचाव यात्रा’, ‘खुर्ची बचाव यात्रा’ आहे, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले आहे. यावर आता भाजपा किंवा शिंदे गटाकडून काय उत्तर येणार हे पाहावे लागेल.

सावरकरांशी भाजपा व RSSचा संबंध काय?
दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, स्वातंत्र्यसंग्रामात भाजपा व आरएसएस कुठे होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे, आम्ही सावरकर जगलो आहोत, जगत आहोत, त्यामुळं भाजप व शिंदे गटाने आम्हाला सावरकारांबद्दल शिकवू नये. तसेच सावरकरांशी भाजपा व आरएसएसचा संबंध काय? असा सवाल संजय राऊतांनी विचारत, भाजपावर टिका केली.

…तर चर्चेतून मार्ग निघेल
काल विरोधीपक्षाची बैठक पार पडली, आम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण शरद पवारांनी देखील सावरकाराविषयी वादग्रस्त बोलणं टाळले पाहिजे. सावरकर हे स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचे नेते होते. त्यांचे कार्य मोठे आहे, सावरकरांचा संघाशी काही संबंध नव्हता, असं पवारांनी काँग्रेसला पटवून दिलं आहे. आम्हाला काँग्रेसची भूमिका पटली नाही, म्हणून आम्ही काल बैठकीला गेलो नाही. पण सावरकरांच्या मुद्दावरुन आमची बोलणं राहुल गांधींशी सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.