अग्निवीर भरतीच्या तयारीत आहात? तर ही बातमी वाचाच; आता द्यावी लागणार आणखी एक परीक्षा

'इंडियन आर्मी रिक्रूटमेंट 2024'साठी अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू होणार असून, यात काही बदल करण्यात आले आहेत. अग्निवीर उमेदवारांना आता आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे.

    नवी दिल्ली : ‘इंडियन आर्मी रिक्रूटमेंट 2024’साठी अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू होणार असून, यात काही बदल करण्यात आले आहेत. अग्निवीर उमेदवारांना आता आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. सैन्यात भरती होणाऱ्या उमेदवारांना या वर्षीपासून ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. मानसिक तपासणी चाचणीबाबत ही परीक्षा राहणार आहे. यामध्ये सैनिकांची तीन बाबींवर तपासणी केली जाणार आहे.

    पहिली तपासणी म्हणजे, उमेदवारमध्ये स्वतःचे नुकसान करण्याची कोणतीही प्रवृत्ती नाही. दुसरे म्हणजे, तो इतरांना इजा करणार नाही आणि तिसरे म्हणजे, त्याच्याकडे सामाजिकदृष्ट्या नकारात्मक दृष्टिकोन नाही. ही नवी परीक्षा अग्निवीर भरती दरम्यान द्यावी लागणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या लष्कर भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य राहणार आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. जिथे थेट भरती असेल तिथे देखील या उमेदवारांना या परीक्षेला बसावे लागणार आहे. वाढत्या आत्महत्या किंवा लष्करातील सहकाऱ्यांवरील हल्ले आणि अनेक सैनिक समाजविघातक कृत्यांमध्ये गुंतलेले असल्याने ही परीक्षा अनिवार्य करण्यात आल्याची माहिती आहे.

    वैद्यकीय चाचणीदरम्यान होणार तपासणी

    सैन्याने मानसिक चाचणीसाठी एक मॉड्यूल तयार केले आहे. ज्यामध्ये वर नमूद केलेल्या तीन पॅरामीटर्सवर सैनिकांच्या मानसिकतेची चाचणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यानच ही परीक्षा पूर्ण होईल. लष्कराच्या सूत्रांनुसार, दरवर्षी 100-140 सैनिक आत्महत्या करतात. तिन्ही दलाची संख्या बघता हा आकडा मोठा आहे.